५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला कपड्याच्या आडून बनावट विदेशी मद्याची तस्करीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.
छापेमारीत कल्याण पडघा मार्गावरील एका गोदामासह कल्याणात उभ्या असलेल्या एका बीएमडब्लू कारमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लाखोंचा विदेशी मद्याचा बनावटी साठा जप्त केला. शिवाय गोदामाला सील करण्यात येऊन बीएमडब्लू कार जप्त करून दोन दारू माफियांना अटक केली आहे. हनुमंत ठाणगे (६२), संदीप दावानी (३४) अशी अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. बीएमडब्लूचा मालक तथा दारू माफियांचा म्होरक्या दिपक जयसिंघानी हा फरार झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली कि, कल्याण-पडघा मार्गावरील देवरुंग गावातील एका गोदामात बनावटी विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवल्याचे सांगितले. त्या माहितीनुसार भरारी पथक आणि राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या संयुक्त कारवाई करत २२ जानेवारी रोजी त्या गोदामावर छापेमारी केली. या गोदामात साठा केलेले दमण व हरीयाणा राज्य निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याच्या साठ्याचे एकूण २६६ बॉक्स जप्त करण्यात आले.
त्यानंतर पुढील तपासात प्राप्त माहितीनुसार तपास पथकाने कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या पार्किंगमध्ये धाड टाकून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बीएमडब्लू चारमधून दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण २५ बॉक्स जप्त करण्यात आले. या दोन्ही छापेमारीत एकुण २९१ बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या छापेमारीत एकूण ५६, लाख ७५, हजार ६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर तिन्ही दारू माफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल हा जुन्या कपड्याच्या गोण्यामध्ये लपवून ठेवून महाराष्ट्र राज्यात आणल्याचे उघडकीस आले आहे. तसेच फ़रार आरोपी दिपक जयसिंघानी याच्या नावे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये अनुज्ञप्ती (वाईन शॉप) असल्याचे निर्दशनास आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे तसेच प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त कोकण विभाग ठाणे व डॉ. निलेश सांगडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.