कही पे निगाहे, कही पे निशाणा!

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेविरुध्द सुरु असलेल्या लढ्याची धार टोकदार केली आहे, हे सांगायला राजकीय निरीक्षकांची गरज नाही. त्याची झलक केंद्रीय मंत्री म्हणुन शपथ घेऊन महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या का. राणे यांनी गेल्या आठवड्यात दाखवली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जे की राज्यातील महाविकासआघाडीचे आणि अर्थातच शिवसेनेचे सर्वात महत्वाचे मंत्री आहेत, यांच्यावर निशाणा साधून, आगामी काळातील उभय पक्षातील संघर्षाचे सुतोवाच केले आहे. ना. शिंदे यांनी खा. राणे यांचे विधान तातडीने खोडून काढले असून आपण शिवसेनेतच रहाणार असल्याचा ठाम निर्वाळा दिला. परंतु राणे यांचे वक्तव्य आणि श्री. शिंदे यांचा त्यावरील खुलासा, इथे अशा बातम्या थांबत नसतात. त्यावरील चर्चा, कुजबुज, तर्क-वितर्क वगैरे काही दिवस सुरू रहातात. राजकारणातील घडामोडींची बिजे त्यात पेरलेली असतात. खा. राणे त्यादृष्टीने यशस्वी झाले असून भाजपाच्या व्युहरचनेची ब्ल्यू प्रिंटच जणू श्री. राणे यांनी सादर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर सोपवली असेल तर नवल नाही. खा. राणे यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल महाविकास आघाडी शंका घेत असली तरी शिवसेनेला आणि एकुणच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पुढच्या काळात अशा संभाव्य घातपाती विधानांना सामोरे जावे लागणार. खा. राणे यांच्या खळबळजनक विधानामुळे धुरळा उडाला हे नक्की. तो बसणार नाही याची काळजी पक्षाचे समाज माध्यम विभाग घेईलच.
राज्यातील सत्ता सेनेने हिरावून घेतल्याची जखम काही केल्या अद्याप भरून येत नसल्यामुळे सेनेला डिस्टर्ब करीत रहाणार.अन्य दोन घटकांकडे त्यांचे लक्ष नाही असाही अर्थ निघतो. आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांचे नेते म्हणत असताना राष्ट्रवादीने ही स्वतंत्र्यपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला तर आश्‍चर्य वाटू नये. अशा वेळी दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ या उक्तीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा फायदा होऊ शकतो. खा. राणे यांनी सेनेवर हल्लाबोल केल्यावर दोन्ही काँग्रेसमधून व्यक्त होणार्‍या प्रतिक्रीया युतीमधील जुन्या मित्रांमधील दूरी आणि त्यातून निष्पन्न होणारी मतविभागणी साध्य होऊ शकते. त्याअर्थी खा. राणे वा भाजपाचे अन्य नेते यांनी सातत्याने सेनेवर तोफ डागणे चुकीचे ठरू शकते. अर्थात त्यांचा आक्रमकपणा चूक की बरोबर हे काळच सांगेल. परंतु एक मात्र नक्की की सेनेला नेस्तनाबूत करण्याचा त्यांचा हेतू आता लपून राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचे प्रभावशाली नेते भाजपाच्या कायम रडारवर रहाणार यात वाद नाही.
भाजपाचा हा आक्रमकपणा सेनेच्या काही वरिष्ठ परंतु हाय-कमांडच्या मेहेरबानीसाठी तहानलेल्या नेत्यांच्या पथ्यावर पडू शकतो. ज्यांची उपेक्षा होत आहे त्यांना एखादे पद मिळाले तर आश्‍चर्य वाटू नये. असे वंचित नेते भाजपाच्या आक्रमकपणामुळे स्वप्न साकारू शकतील. सेना हाय-कमांड अशा नेत्यांवर केवळ बारीक नजर ठेवणार नाही तर त्यांची विशेष काळजीची घेतील ते काही असले तरी भाजपाचा फायदा होईल की नाही याबद्दल शंका आहे.
या पार्श्‍वभूमीवर भाजपाने टीकेचा मार्ग थोडा बदलला तर ते इच्छित स्थळी नक्की पोहोचतील. भाजपा-शिवसेना संघर्षाकडे जनताही जागरूकपणे पहात असते. त्यांनाही सातत्याने होणार्‍या टीकेचा उबग येऊ शकतो. त्यापेक्षा महाविकासआघाडीतील मर्यादा आणि चुकांचा परामर्श घेणे संयुक्तिक ठरेल. व्यक्तीगत आरोपांपेक्षा मुद्यांना लक्ष्य केले तर ते भाजपाच्या फायद्याचे ठरेल. काय सांगावे त्यामुळेच त्यांना जन-आशीर्वाद मिळेल!