मेंदू उमेदवारांचे आणि मतदारांचे !

ज्या मतदार संघातले उमेदवार जाहीर झाले आहेत तेथील मतदारांना आम्ही जे विचार मांडतोय ते उमेदवाराचे चित्र डोळ्यासमोर आणून ताडता येऊ शकतील. जिथे उमेदवारीबाबत अनिश्‍चितता आहे, तिथे हेच मुद्दे संभाव्य उमेदवारात असणार हे लक्षात घ्यावे. उमेदवार कोणी असो, म्हणजे कोणत्याही आकाराचा, स्वभावाचा किंवा ढोबळ मानाने त्याचे बाह्य स्वरुप या अर्थाने, त्याच्यापाशी असलेला मेंदू मात्र सर्वसामान्यता एकाच आकाराचा असणार. फरक इतकाच की मतदारांच्या इवल्याशा (हो, मेंदू संपूर्ण देहाच्या आकारमानाने छोटाच असतो. पेहलवानाचा मेंदू किंवा गेला बाजार पंतप्रधान अथवा अगदी राष्ट्रप्रमुखाचा मेंदू लहानच असतो.) फक्त मतदान कोणाला करायचे इतकाच त्यात विचार असतो. या उलट उमेदवाराचा छोटासा मेंदू अपेक्षा, महत्वाकांक्षा, डावपेच, कट-कारस्थाने, पूर्व वैमनस्य, नव्या सोयरीकी , आर्थिक व्यवहार (उघड आणि छुपे – दोन्ही ) प्रतिस्पर्धांच्या व्युहरचना, वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचे विचार, कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचे विचार, कधी खोटे बोलणे, कधी खरे बोललेले अंगाशी येणार नाही याचा विचार, कधीकाळी केलेले अपमान, अहंकाराला लागलेल्या ठेचेमुळे लक्षात राहिलेल्या वेदना, प्रतिस्पर्धी पक्षाला खिंडार पाडण्याचे विचार, मतदारांच्या मनात घर करण्याची असोशी, अशा शेकडो विचारांनी मेंदू पार व्यापून जात असतो. अगदी भुगा होतो म्हटले तरी चालेल! मतदानाच्या दिवशी जो काही प्रचार केला होता त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो या विचाराने तर उमेदवाराची मती सुन्न होत जात असते. काय अवस्था होत असेल त्या छोट्याशा मेंदूची? एक मेंदू ओव्हरटाईम करीत असताना मतदार मात्र शांत-निवांत झोपत असतो. उडालेल्या झोपेची किंमत खासदार होऊन वसुल होत असते आणि मग पुढील पाच वर्षे याच मेंदूला काही खासदार सक्तीच्या रजेवरही पाठवत असतात, ही बाब अलाहिदा.असे निष्क्रिय खासदार (५४३पैकी किमान २५०)पुन्हा मतदारांच्या दारी येणार आहेत. या उमेदवारांची आर्थिक स्थिती सुधारत असली तरी मेंदूचा आकार मात्र काही केल्या वाढत नसतो. किंबहुना तो आकुंचन पावल्याचा प्रत्यय येतो!सर्वसामान्यांच्या नजरेस गायब होणारे उमेदवार क्वचित प्रसंगी नजरेस पडला असते तर काय सांगावे मतदारांचा दृष्टीकोन बदलला असता आणि कौलही! अशा अधूनमधून का होईना दिसणारे उमेदवार मेंदू वापरुन काम करीत असतात हे आवर्जून सांगितले पाहिजे.
प्रचारासाठी जेमतेम तीन आठवड्यांचा कालावधी प्रत्येक उमेदवाराच्या वाट्याला येत असतो. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी मेंदूची बऱ्यापैकी झिज होत असते. निवडून येण्यासाठी लागणारा एकमेव विचार उमेदवाराचे सर्व मनोव्यापार नियंत्रित करीत असतो. अशावेळी मतदारांना पुन्हा सामोरा जाणारा खासदार केलेल्या कामाची मांडणी करीत असतो. त्यात काही सांगण्यासारखे नसेल तर तो लोकसभेत बजावलेल्या कामगिरीचे भांडवल करु पहातो. परंतु तिथेही तो कोणत्या तरी हाताच्या घडीवर हनुवटी ठेऊन बाकावर नुसता बसला असेल आणि त्याला भाषणही करायला मिळाले नसेल तर मतदारांवर प्रभाव पाडणे त्याला कठीण होते. असा उमेदवार तुमच्या नशिबी येणार असेल तर मेंदू बाजुला ठेऊन मतदान करण्याखेरीज तुमच्यासमोर पर्यायही रहात नसतो.
या सर्व भानगडीत मतदारांच्या समुहाने वार्तालाप करुन उमेदवाराला नको ते प्रश्न विचारले, तर त्याच्या इवल्याशा मेंदूला मुंग्याच येऊ लागतात. काही वेळा या उमेदवारांची दया येऊ लागते. अर्थात अशा दयेचे रुपांतर सहानुभूतीत होत नसते. त्यामुळे दयेपेक्षा कीव येते आणि त्याचे रुपांतर मतदानात होत नसते.
उमेदवार आपली ही केविलवाणी स्थिती स्वत:च करुन घेत असतो. निवडणूक रिंगणात उतरल्यापासून, पुढे मतदारांचे प्रतिनिधीत्व करताना सर्व वर्तन विवेक आणि सद्सदविवेक बुद्धीला स्मरुन केले तर मेंदू आपणहून काही नकारात्मक कचरा साठू देत नाही. उदाहरणार्थ मतदारांना आपण खोटी आश्वासने दिलीच नाही तर?जे काही करायचे ते प्रामाणिकपणे करायचे, मेंदूवरील थोडासा भार हृदयावर अर्थात अंत:करणावर टाकायला हवा. इवलासा मेंदू मनापासून काम करु लागला तर संबंधित उमेदवाराला जिंकून येण्याची शक्यता अधिक आहे. मेंदू नावाचे निरंतर चालणारे यंत्र ऐन निवडणुकीत बंद पडू नये म्हणजे मिळवले!एरवी मेंदू बाजूला ठेऊन मतदान करण्याची ‘फॅशन’ मात्र लोकशाहीला पोषक ठरणार नाही, हे मात्र नक्की!