इमारतीचा भाग कोसळला; रहिवाशांना तत्काळ बाहेर काढले

उल्हासनगर: उल्हासनगर मधील चार मजली द्वारकाधाम या इमारतीचा समोरचा भाग बाल्कनीसह सायंकाळच्या सुमारास कोसळला.

महापालिका प्रशासनाने तत्काळ धाव घेत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढत इमारत रिकामी केली. उल्हासनगर कॅम्प 3 मधील रामायण नगरच्या बाजूला द्वारकाधाम ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत दोन विंग असून जवळपास 66 सदनिका आणि एक दुकान या इमारतीत होते. इमारती बाहेरून भग्न दिसत असल्यामुळे या इमारतीतील बहुतांश सदनिका या खाली झाल्या होत्या. मात्र असे असले तरी काही कुटुंब या इमारतीत रहिवास करत होती. इमारतीची अवस्था ही दयनीय झाल्यामुळे महापालिकेने यापूर्वी या इमारतीला धोकादायक घोषित केले होते.

गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास या इमारतीचा रस्त्याकडचा समोरचा भाग कोसळला. यावेळी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच ज्या सदनिकांची बाल्कनीचा भाग कोसळला. त्या सदनिका ह्या रिकामी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित तसेच वित्तहानी टळली. ही घटना अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाला कळतात पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे, दत्तात्रय जाधव, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके आदींनी इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांना इमारती बाहेर सुखरूप काढले. तसेच त्यानंतर इमारतीसमोरील मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारत एका बाजूला झुकल्यासारखी वाटत असल्याने या इमारतीच्या बाजूची अन्य एक इमारत देखील खाली करण्यात आली आहे.