घोडबंदर मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगड्यांकडे दुर्लक्ष
ठाणे: घोडबंदर मार्गावर खासगी बसगाड्या ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावर उभे असलेल्या प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असून आरटीओ, वाहतूक शाखा आणि ठाणे परिवहन सेवेला याबाबत अवगत करूनही कारवाईअभावी
या गाड्यांचा व्यवसाय निर्धोक सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाण्यात समांतर परिवहन सेवा सुरु आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
बोरिवलीहून घोडबंदरमार्गे ठाणे पूर्व भागाकडे विविध मार्गाने खासगी बसगाड्या बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करत असतात. ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्यावर उभे असलेल्या या प्रवाशांचीही या गाड्यांमधून वाहतूक केली जाते. यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. परिणामी दरवर्षी नुकसान भरून काढण्यासाठी महापालिकेकडे अनुदानासाठी हात पसरावे लागतात. अर्थात ठाणेकरांनी कर रूपाने दिलेल्या पैशांतून परिवहनला दरवर्षी पोसावे लागते.
जागर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घोडबंदर मार्गावर खासगी बसगाड्यांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर लक्ष ठेऊन त्याची माहिती परिवहन समितीला लेखी पत्राद्वारे दिली. तसेच कारवाईसाठी पोलीस वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागालाही संस्थेने पत्र दिले. याबाबत परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी पाहणीसाठी कर्मचारी नेमल्याची माहिती दिली. तसेच कारवाईसाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) आणि आरटीओ विभागाला बस क्रमांकासह पत्र दिल्याचेही बेहरे यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन विभागाने नवी मुंबई आणि इतर भागात या बसगाड्यांवर कारवाई सुरू केली आहे, मात्र घोडबंदर मार्गावर बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांवर अद्याप कारवाई सुरू नसल्याने परिवहन सेवेचे उत्पन्न घटत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या गाड्यांवर वर्षानुवर्षे कारवाई होत नसल्याने यामागे कोणाचे हीत जोपासले जात आहे? ही समांतर परिवहन सेवा तर नाही ना? असे प्रश्न जागरूक ठाणेकर उघडपणे विचारू लागले आहेत.
याबाबत परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परिवहन प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. घोडबंदर मार्गावर ठाणे परिवहनच्या सध्या ४० बस धावत असून लवकरच परिवहनच्या ताफ्यात आणखी ५७ बस दाखल होणार आहेत. नादुरुस्त बस दुरुस्त करवून जास्तीत जास्त बस रस्त्यावर आणून प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सध्या रोज सरासरी २५ ते २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. खासगी बसगाड्यांवर कारवाई झाल्यास निश्चितच उत्पन्नात मोठी भर पडेल, अशी माहिती, श्री.जोशी यांनी दिली.