दीड लाखांहून अधिक कोपरीकर दिवसभर ‘गॅस’वर

एमजीएलची पीएनजी सेवा अचानक सहा तास बंद

ठाणे : ‘महानगर गॅस’च्या स्वयंपाकासाठी असलेली सेवा शुक्रवारी अचानक दुपारी दीडनंतर सुमारे पाच तासांहून अधिक वेळ  खंडीत झाल्यामुळे शेगड्या बंद  राहिल्या. दीड लाखांहून अधिक कोपरीकर आणि मुलुंडकर दिवसभर ‘गॅस’वर होते.

सायंकाळी उशिरापर्यंत गॅस पुरवठा चालू न झाल्यामुळे गृहिणींसमोर सायंकाळच्या स्वयंपाकाचे काय करायचे असा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला होता. रात्री ११ वाजेपर्यंत गॅस पुरवठा बंद राहणार असल्याचे ‘मेसेजस्’ ‘महानगर गॅस’ने आपल्या ग्राहकांच्या मोबाईलवर वितरीत केल्यामुळे लाखो ग्राहक दिवसभर ‘गॅस’ वर होते.

मुलुंडमध्ये एका नव्या बांधकामांसाठी ‘एमजीएल’च्या गॅस वाहिनीचे काम करताना जेसीबीचा जोरदार धक्का लागून पाईपमधून गॅस बाहेर पडू लागला. गॅस बाहेर आल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी एमजीएलकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. दुपारी साडेतीन-चार वाजल्यानंतर ‘महानगर’च्या कर्मचा-यांनी ती यंत्रणा सुरु केली. त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊन तेथे ‘विशेषत: ’बसवलेल्या ४०० पेक्षा अधिक आणि सुमारे १२ कमर्शियल आस्थापनांतही याच यंत्रणा सुरु केल्या. रात्रीदेखील हे काम सुरु होते.

ही घटना घडताच एमजीएलच्या ग्राहकांसाठी असलेले दोन क्रमांक सतत खणखणत होते. असंख्य ‘कॉल्स’ एकापाठोपाठ सुरु असल्याने अनेक ग्राहकांना ‘यू आर वेटिंग’ची टेप ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘७० हजारांहून अधिक ठाणेकरांच्या घरातील पीएनजी बंद पडल्यामुळे सर्वच घरांमध्ये चहा व कॉफीसह जेवण, पदार्थ शिजले नाहीत. त्यामुळे अनेक ग्राहकांनी आम्हाला त्वरेने संपर्क साधून जेवणाच्या आॅर्डर्स दिल्या होत्या. आमच्या दुकानात कमर्शियल गॅस असल्यामुळे त्यांच्या आॅर्डर्सची पूर्तता करता आली, असे ठाणे पूर्व येथील श्रीकृपा पोळीभाजी केंद्र’च्या मधुरा उदय लेले यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले. हीच व्यथा त्यांनी या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

मुलुंड पूर्व व पश्चिमेकडील एक लाखापेक्षा जास्त रहिवाशांनाही याचा फटका बसला, अशी माहिती मुलुंड पूर्व /पश्चिम भागाचे भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली.