ठाणे : भिवंडी पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांसह अंमलदारांना सतर्क करुन गस्त घालण्याचे आदेश दिल्याने मोबाईल, जबरी चोरी, घरफोडी, रिक्षा चोरटे जेरबंद करण्यात यश आले आहे. यातील शर्विलक २५ वयवर्षांखालील आहेत.
नारपोली पोलीस ठाण्यातंर्गत एकूण ६ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ४ लाख ९२ हजार ६९१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानुसार या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी भिवंडी पूर्वचे सहाय्यक आयुक्त प्रशांत ढोले, नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी कारवाई सुरु केली.
नारपोली ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक चेतन पाटील व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. पोलिसांनी तातडीने असे गुन्हे करणा-या असिफ मलिक बागवान (वय २३, रा. नवी वस्ती भिवंडी), अकबर शौकत शेख (२४ रा. निजामपुरा भिवंडी), बैजनाथ वर्मा(४७ रा. अंजुरफाटा), गौरीशंकर पुजारी आरक(३० रा. भिवंडी), गुलजार खान, २२ रा. वडपे), इरफान शेख, १९, रोशनबाग, भिवंडी), आबीद अन्सारी वय २४, माधवनगर भिवंडी) यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केली व त्यांच्याकडून कौशल्यपूर्ण तपास केला. त्यातून ६ गुन्हे उघडकीस आले.
आसिफ बागवान आणि अकबर शेख यांच्याकडून ७२ हजार रुपये किंमतींचे वेगवेगळ्या कंपन्यांचे सहा महागडे मोबाईल, वैजनाथ वर्मा आणि पुजारीकडून ३५ हजार रुपयांचे पॉलीकॅब रोल आणि १ लाख २० हजार रुपयांचे २९८ किलो वजनाच्या ६ अॅल्यूमिनियम प्लेट्स आणि त्याच्या मालवाहतुकीसाठी १ लाख रुपयांचा टेंपो, गुलजारक़डून ६० हजार रुपयांची रिक्षा व १९ वर्षांच्या इरफानने २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र व १० हजारांचा मोबाईल आणि गुन्ह्यांकरीता वापरलेली ७० हजार रुपयांची मोटारसायकल असा ऐवज जप्त केला आहे.
वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ, निरीक्षक (प्रशासन) राजेश वाघमारे, निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव, सहाय्यक निरीक्षक चेतन पाटील , सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धिवार, हवालदार जयराम सातपुते, हरिश हाके, सुशील इथापे, समीर ठाकरे, नंदकिशोर सोनगिरे, पोलीस नाईक सागर म्हात्रे, राजेश पाटील, पोलीस शिपाई जनार्दन बंडगर आणि ताटे (नेम नियंत्रण) यांनी हे गुन्हे उघडकीस आणले.