ठाणे : गेल्या महिन्याभरापासून ठाणे शहरासह जिल्ह्यात कोव्हीशील्ड लससह लहान मुलांना देण्यात येणारी कॉब्रोव्हस लसही मागील १० दिवसांपासून उपलब्ध नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी लशींची अनुपलब्धता चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहमेंतर्गत शहरात ३५ केंद्रांच्या माध्यमातून लस दिली जाते. कोरोनाचा वेग मंदावला असतांना लसीकरणाचा वेगही मंदावल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहरात आतापर्यंत १५ ते १७ वयोगटातील ९०.३० टक्के जणांनी पहिला डोस आणि ७१.४० टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ वर्षावरील नागरीकांच्या पहिल्या डोसचे प्रमाण १००.१० टक्के आणि दुसऱ्या डोसचे प्रमाण ८०.१६ टक्के एवढे आहे. तर बुस्टर डोस केवळ १ लाख ६७ हजार २३० नागरीकांनी घेतला आहे.
लसीकरण शिल्लक असतांनाही आता राज्य किंवा केंद्राकडून महापालिकेकडे कोव्हीशिल्डचा साठा मागील चार आठवडे म्हणजेच महिनाभरापासून उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे दुसरा किंवा बुस्टर डोस कुठे घ्यायचा असा पेच नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे. दुसरीकडे लहान मुलांना देण्यात येणारी कॉब्रोव्हस ही लसही मागील १० दिवसांपासून उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. याचाच अर्थ ठाण्यात लसीकरण सध्या थांबले असल्याचेच दिसत आहे.
दुसरीकडे शहरात सध्या केवळ कोव्हॅक्सीनचा साठा उपलब्ध असल्याने त्यामाध्यमातून लसीकरण सुरु असल्याची माहिती महापालिकेने दिली. परंतु लस उपलब्ध नसल्याने देखील लसीकरण केंद्रावरील गर्दी देखील ओसरली असल्याचे चित्र दिसत आहे