ठाण्यात गृह प्रदर्शनाचे दिमाखदार उदघाटन
ठाणे : ‘एमसीएचआय’चे सदस्य घरांच्या विक्रीबद्दल नव्हे तर नागरिक उत्तम घरांमध्ये कसे राहतील याचा विचार करतात, अशा शब्दांत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी गृह प्रदर्शनाचे कौतुक केले
ठाण्यातील प्रमुख रिअल इस्टेट आणि होम फायनान्स एक्स्पो, प्रॉपर्टी 2023 ची शानदार सुरुवात ३ फेब्रुवारी रोजी रेमंड ग्राऊंड येथे सुरू झाली आणि रिअल इस्टेटमधील बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शानदार उद्घाटनाने समारंभाला सुरुवात झाली. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंग यावेळी उपस्थित होते.
ठाणे शहराचा कायापालट गेल्या काही दशकांपासून दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले. गेल्या १८ वर्षांपासून ठाण्याचा रहिवासी या नात्याने मी हा बदल पाहिला आहे आणि भविष्यातही हा बदल कायम राहील याची मला खात्री आहे. ‘तलावांचे शहर’ मुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात वाढ आणि विकासाचा आधार आहे. एक्स्पोबद्दल मला खरोखर सकारात्मक वाटले. कारण रिअल इस्टेट डेव्हलपर्स, क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे सदस्य त्यांच्या प्रकल्पांमध्ये कुटुंबे स्थायिक कशी होतील, याविषयी बोलतात आणि ते ‘घरे विकण्याबद्दल’ बोलत नाहीत, अशी पावती शिनगारे यांनी यावेळी आयोजकांना दिली.
ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनीही या ‘ठाणे एक्स्पो’चे कौतूक करताना, विविध रंगांचे आणि भावनेचे प्रतिबिंब आहे, अशी भावनिक पावती दिली. ‘एक्स्पो’मध्ये घरे उपलब्ध असलेल्या किंमतीच्या विस्तृत श्रेणीचा उल्लेख केला आणि गृह शोधणा-यांसाठी हे चांगले असल्याचेही सांगितले.
‘शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ठाण्यात, पोलिसिंग म्हणजे केवळ सुरक्षा राखणे नव्हे, तर ठाणे एक सुरक्षित शहर राहील याची खात्री करणे असे आहे. विकासाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे सुरक्षित वातावरणाचा आनंद घेईल,अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित असलेल्या व्यावसायिकांच्या गर्दीला पाहून ‘क्रेडाई एमसीएचआय’चे अध्यक्ष (ठाणे) जितेंद्र मेहता म्हणाले, ‘या एक्स्पोसाठी मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि वॉक-इन्सची संख्या सूचित करते की, हा एक्स्पो वर्षभरातील मालमत्ता विक्री वाढीचा पाया घालणार आहे.
‘यावेळी एक्स्पोची वेळ योग्य होती. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सकारात्मक भावनांना चालना मिळाली आहे आणि पहिल्याच दिवशीच्या या क्षेत्रातील धुरिणांच्या उपस्थितीमुळे हे सिद्ध झाले आहे, असे तत्कालिन माजी अध्यक्ष अजय आशर म्हणाले.