आमदारकीसाठी योग्य माणूस; शिंदे गटाकडून मुल्ला यांचे कौतुक

नरेश म्हस्के यांच्या विधानाने खळबळ

ठाणे: नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. हा बॅनर शिंदे गटाने लावण्याचा प्रश्नच नाही. नजीब मुल्ला हे ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक असून ते आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असल्याचे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. त्यांच्या वक्तव्यामुळे भविष्यातील शिंदे गटाचे कळवा – मुंब्रा मतदार संघाचे आमदारकीचे उमेदवार मुल्ला तर नाहीत ना असे तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहे.

कळवा-मुंब्रा भागात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचे फोटो लावण्यात आल्याने राजकीय वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना विचारले असता ते म्हणाले, त्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे फोटो आहेत. या बॅनरवर आमचे फोटो लावले असतील पण, ते बॅनर राष्ट्रवादीचेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अशा प्रकारचे बॅनर लावत असतील तर, त्यावर आमची प्रतिक्रिया घेण्याऐवजी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना त्याबाबत विचारावे. जर राष्ट्रवादीचे नगरसेवक आमचे फोटो बॅनरवर लावत असतील तर आम्हाला नक्कीच आनंद आहे, असा चिमटा देखील म्हस्के यांनी काढला.

नजीब मुल्ला हे अभ्यासू ज्येष्ठ नगरसेवक आहेत. आमदारकीसाठी लागणारे सर्व गुण मुल्ला यांच्यात असल्यामुळे ते आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असल्याचे देखील म्हस्के म्हणाले. जर ते आमच्यात येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू,परंतु अद्याप असा काही विषय नसल्याचे देखील नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.