सेवा रस्त्यांची दुरुस्ती होईना; घोडबंदर मार्गाची कोंडी सुटेना!

ठाणे: ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांसाठी ६०५ कोटी एवढा बक्कळ निधी मिळूनही सेवा रस्ते नादुरुस्त राहिले आहेत. परिणामी त्याचा ताण मुख्य रस्त्यांवर पडून वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. घोडबंदर मार्गावर मार्गावर तर एकीकडे मेट्रोची कामे तर दुसरीकडे सेवा रस्त्यांची दुरवस्था यामुळे या माजिवड्यापासून गायमुखपर्यंतच्या मार्गाची कोंडी सुटता सुटत नाही.

रस्त्यावरील नियमित खोदकामामुळे व पावसाळ्यात होत असलेल्या दुरवस्थेमुळे सेवा रस्त्यांची अवस्था बिकट होते. त्यात मेट्रो-४ च्या कामांची भर पडली आहे. मेट्रो- ४ चे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जलद गतीने कामे सुरू असून गर्डर टाकण्यात येत आहेत. पण हे काम करण्यासाठी लागणारे अवजड पोकलेन मशिनची वाहतूक गाडीतून न करता थेट रस्त्यांवरून होत आहे. त्यामुळे सुस्थितील सेवा रस्त्यांची वाट लागली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठक घेऊन हे सेवा रस्ते दुरुस्त करण्याच्या सुचना केल्या होत्या.  त्यापैकी तत्वज्ञान ते मानपाडा नाकापर्यंतचा सेवा रस्ता मास्टिकने दुरुस्त करण्यात आला आहे. उर्वरित मानपाडा ते डिमार्ट आणि कोर्टयार्ड परिसरातील सेवा रस्ते अजूनही जैसे थे आहेत. वास्तविक घोडबंदरच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास छोट्या वाहनचालकांना या सेवा रस्त्यांमुळे दिलासा मिळतो. पण हे सेवा रस्तेही ना दुरुस्त असल्याने घोडबंदर पट्ट्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. विशेषता मानपाडा ते पुढे घोडबंदरच्या दिशेने प्रवास करणार्‍या वाहनांना दहा मिनिटांसाठी ३० ते ४० मिनिटे खर्च करावी लागत आहेत.

वास्तविक ठाण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या आणि आधी बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर यावर्षी कुठेच खड्डे आढळले नाहीत. मात्र शहरातून जाणार्‍या एमएमआरडीए, राज्यमार्ग, पूर्वद्रुतगती मार्ग खड्डयात गेला. त्याचा तापही ठाणेकरांना सहन करावा लागला. त्यामुळे हे रस्ते कोणत्या प्राधिकरणाचे आहेत हे न पाहता पालिकेने सर्वाधिक वर्दळ असलेला माजिवाडा उड्डाणपूल आणि नितिन कॅडबरी जक्शन येथील रस्ते दुरूस्त केल्याचा दावा करण्यात येत आहे.

ठामपा हद्दीतील ३८४ किमी लांबीच्या रस्त्यांपैकी ३९ किमी रस्ते मास्टिक पध्दतीने बांधण्यात आले आहेत. ही टक्केवारी वारी एकूण रस्त्यांच्या १० टक्के आहे. याशिवाय ९५ किमी म्हणजे २५ टक्के रस्त्यांचे डांबरीकण करण्यात आले आहे. तर ६५ टक्के म्हणजे तब्बल २५० किमीचे रस्ते युटीडब्ल्यूटीने मजबूत करण्यात आले असल्याची माहिती संबंधित पालिका अधिकार्‍यांनी दिली.