प्लास्टिक कागदाने पादचारी पुलाची देखभाल-दुरुस्ती

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे रेल्वे स्थानक व रिलायन्स हॉस्पिटल यामध्ये असणाऱ्या पादचारी पुलाची दुरावस्था झाली आहे. या पुलाच्या छताचे पत्रे निघाले असून त्यास प्लास्टिक कागदाने झाकले आहे. त्यामुळे या पादचारी पुलांकरिता देखभाल दुरुस्तीसाठी करण्यात येणारा खर्च जातो कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेने दिघा ते सानपाडा अशा ठाणे-बेलापूर मार्गाचे काँक्रीटीकरण केले आहे. त्यामुळे या मार्गावर भरधाव वाहने धावू लागली. अशा वाहनांमुळे अपघात न होता सर्व सामान्य नागरिकांना रस्ता ओलांडता यावा म्हणून पालिकेने या मार्गावर आतापर्यंत सहा पादचारी पुलांची निर्मिती केली आहे. पादचारी पुलांच्या देखभाल दुरुस्तीकरीता नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपयांचे ठेके ठेकेदारांना देते. मात्र सदर ठेकेदार देखभाल दुरुस्तीकडे नेहमीच कानाडोळा करीत आलेले आहेत. या पादचारी पुलामधील रबाळे, खैरणे येथील उद्वाहक नेहमीच बंद असल्याचे दिसून येते. तर तुर्भे आणि ऐरोली पुलाला फेरीवाल्यांचा कायम विळखा असतो.

आता कोपरखैरणे रेल्वे स्थानक व रिलायन्स हॉस्पिटल यामध्ये असणाऱ्या पादचारी पुलाची पुरती दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या छताचे पत्रे उडाले आहेत. त्या जागी नवीन पत्रे टाकण्याऐवजी ठेकेदाराने प्लास्टिक कागदाचे आवरण टाकले आहे. त्यामुळे दरवर्षी या पादचारी पुलांकरिता देखभाल दुरुस्तीसाठी करण्यात येणारा खर्च जातो कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे रेल्वे स्थानक व रिलायन्स हॉस्पिटल यामध्ये असणाऱ्या पादचारी पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट निविदा प्रक्रियेत असून फेर निविदा काढण्यात आली आहे. त्याची ३० ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सदर कामास पात्र ठेकेदारास कंत्राट देताच या पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती उप अभियंता पंढरीनाथ चवडे यांनी दिली आहे.