मीरा-भाईंदर महापालिकेतील १०६ जागांची सोडत ५ऑगस्टला

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या १०६ जागांवरील आरक्षण सोडत येत्या ५ ऑगस्ट रोजी काढली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने या वर्षी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय पॅनलप्रमाणे घेण्याचे जाहीर केले आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ता स्थापनेची मुदत २७ ऑगस्ट रोजी संपुष्टात येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करून ती ऑक्टोबरपर्यंत पार पाडण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे.

आगामी निवडणुकीत शहरात एकूण ६ लाख २८ हजार ७२० मतदार आहेत. या सदस्य पॅनलप्रमाणे ३५ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये १०६ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असल्यामुळे चारचा प्रभाग करण्यातआला आहे. प्रभाग क्र. १०, १७, २६, ३५ मध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातील लोकसंख्या जास्त असल्याने हे चार प्रभागांतील एक-एक जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत, तर २६ व ३५ या प्रभागांत अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या जास्त असल्याने या दोन प्रभागांत या उमेदवारासाठी दोन्ही प्रभागात एक-एक जागा ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. ५० टक्के महिला आरक्षणाप्रमाणे एकूण १०६ जागांपैकी ५३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, जातीनिहाय आरक्षणे वगळता उर्वरित ८० जागा सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यातील ४० जागा याच प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत, तर २० जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्या जागांवरील आरक्षण सोडत येत्या ५ ऑगस्ट रोजी काढली जाणार आहे. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ६ ते १२ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हरकती व सूचनांवरील सुनावण्या पार पडल्यानंतर २० ऑगस्ट रोजी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १३ ते २२ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकतींवरील सुनावण्या पार पडल्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.