ठाणे/आनंद कांबळे
दोन महिन्यांपासून तयार असलेले गावदेवी येथील भूमिगत वाहनतळ लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असल्याने त्याचा फटका ठाणेकरांना बसत आहे. जागा नसल्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई झाल्याने त्यांना नाहक दंड भरावा लागत आहे.
ठाणे महानगर पालिकेने गावदेवी मैदान येथे २९ कोटी रुपये खर्च करून भूमिगत पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील अडीच वर्षे या भूमिगत पार्किंग प्लाझाचे काम सुरू होते. या ठिकाणी सुमारे तीनशे चार चाकी आणि आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नौपाडा येथे खरेदीसाठी आलेल्या तसेच मुंबईत नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्या ठाणेकरांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर गाड्या पार्क कराव्या लागतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने बेकायदेशीर पार्किंग केल्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस ठाणेकरांच्या दुचाकीला सातशे तर चार चाकी गाडीला अकराशे इतका दंड वसूल करत आहे.
दुसरीकडे गावदेवी मैदान भूमिगत पार्किंग ही चांगली सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या पार्किंगचे काम पूर्ण झाले आहे तर गावदेवी भाजी मंडई येथील दुचाकी पार्किंगची सोय महापालिकेच्या धोरणामुळे रखडली आहे, त्यामुळे ठाणेकरांना रस्त्यावरच गाड्या पार्क कराव्या लागत आहेत. परिणामी ठाणेकरांना वाहतूक शाखेने ठोठावलेला भुर्दंड सोसावा लागत आहे. पार्किंगची व्यवस्था असून देखिल महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील रस्ते वाहतूक कोंडीमुक्त असावेत यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजने अंतर्गत ठाणेकरांना पार्किंग सुविधा मिळावी यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु काम होऊन देखील केवळ लोकार्पण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला वेळ मिळत नसल्यामुळे ठाणेकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या दोन्ही पार्किंग व्यवस्था ठाणेकरांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.