दिवाळीच्या तोंडावर दर आणखी वाढण्याची शक्यता
नवी मुंबई: एपीएमसी बाजारात सोमवारी आवक घटल्याने अचानक कांद्याच्या दरात पाच ते सात रूपयांनी उसळी घेतली आहे. सोमवारी कांदा २७ ते ३२ रुपये प्रतिकिलो विकला गेला. दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवरून विविध बाजार समित्यानी बंद पुकारल्याने कांदाविक्री ठप्प होती, मात्र बाजार समित्या सुरू झाल्यानंतर आवक सुरळीत झाली असली तरी कांद्याचा दर्जा सुमार होत गेला. परिणामी कांद्याला हवा तसा भाव मिळाला नाही. बाजारात नवीन कांद्याची आवक घटली असून जो मध्यम दर्जाचा कांदा येत आहे त्याचा दर्जा देखील फारसा चांगला नाही. त्यामुळे बाजारात सध्या उच्च प्रतीच्या कांद्याला मागणी अधिक आहे. मात्र तरीही आवक घटली आहे.
वाशीतील एपीएमसी बाजारात सरासरी ११० ते १४० गाड्या आवक होत असते. मात्र सोमवारी बाजारात अवघ्या ७६ गाड्या आवक झाली. त्यामुळे मागणीनुसार आवक घटल्याने कांद्याच्या दराने पाच ते सात रुपयांनी उसळी घेतली. राज्यात कांद्याचे उत्पादन कमी होत असल्याने आवक कमी होत आहे. आवक अशीच राहिली तर दिवाळीच्या दिवसांत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.