ठाण्याच्या माजी नगरसेविका रागिणी बैरशेट्टी शिवबंधनात

शिंदे गटाला देणार आव्हान

ठाणे: माजी नगरसेविका रागिणी बैरशेट्टी यांनी त्यांच्या पती भास्कर बैरशेट्टी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात मातोश्रीवर जाऊन प्रवेश केला आहे. शिंदे गटात ठाणे महापालिकेचे ६४ माजी नगरसेवक असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याच गटातील रागिणी बैरशेट्टी यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला असून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाला आव्हान देण्याची चिन्हे आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर ठाण्याचे शिवसेनेचे ६४ नगरसेवक शिंदे गटात असल्याचा दावा करण्यात येत होता. यापैकीच माजी नगरसेविका रागिणी बैरशेट्टी यांचा समावेश होता. रागिणी बैरशेट्टी, आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका परिषा सरनाईक तसेच अन्य दोन नगरसेवक असा चार नगरसेवकांचा पॅनल होता. यामध्ये आमदार प्रताप सरनाईक आणि रागिणी बैरशेट्टी यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्याही कारणांनी खटके उडत होते. यापूर्वी सरनाईक आणि बैरशेट्टी यांच्यात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील संघर्ष पाहायला मिळाला आहे. आमदार सरनाईक हे शिंदे गटात असल्याने हा संघर्ष टाळण्यासाठी अखेर त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.

या प्रवेशाच्या वेळी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ओवळा माजीवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उप जिल्हाप्रमुख व प्रवक्ता संजय घाडीगावकर व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा भाजप प्रवेश थांबल्याने या पट्ट्यात राजकारण चांगलेच तापले आहे. बैरशेट्टी ज्या पॅनलमधून प्रतिनिधित्व करतात त्या शिवाईनगर, येऊर या प्रभागातून सुलेखा चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला तिकीट मिळेल कि नाही याबाबत साशंक असलेल्या बैरशेट्टी यांनी थेट उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.