ग्रासरुटपासून सुरु झालेल्या कारकीर्दीत मंत्रिपदाचा टप्पा आला तर तो केवळ नशिबाचा भाग समजून नजरंदाज करणे उचित ठरणार नाही. तसे करणे त्या व्यक्तीने केलेल्या अथक परिश्रमाचा अपमान ठरू शकतो. ना. जितेंद्र आव्हाड यांचा राजकीय प्रवास या क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्या अनेक इच्छुकमंडळींना ते स्वप्नवत वाटू शकतो. पण असे स्वप्न पडण्यासाठी झोपेचा त्याग करावा लागतो, हेही लक्षात घ्यावे लागेल.
गृहनिर्माणसारखे महत्वाचे खाते, जे शहरीकरणाच्या प्रक्रियेला एक रचनात्मक स्वरुप देते ते, ना. आव्हाड यांच्याकडे आहे. शहरात वाढलेल्या आणि घडलेल्या नेत्याला सर्वसाधारणपणे घराचे स्वप्न काय असते, त्यासाठी करावा लागणार्या संघर्षाचे मोल काय असते, त्याग आणि उपेक्षा यातून अखेर तावूनसुलाखून पदरी पडणारे डोक्यावरचे छत त्याचे मूल्य हे किती अपरिमित असते हे तोच जाणो. जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांच्या आस्तित्वाला अर्थ देणार्या प्राथमिक गरजांपैकी एक घर असते. ना. आव्हाड यांच्याकडे हे आव्हानात्मक पद देऊन पक्षाने त्यांच्या कर्तृत्वावरच एकप्रकारे शिक्कामोर्तब केले.
राज्यात आपली छबी उमटवू पहाणार्या ना. आव्हाड यांच्याकडून ठाणेकरांच्या अपेक्षाही आहेत. बीडीडी चाळ प्रकल्प असो की म्हाडाच्या माध्यमातून गरजूंना मिळणारी घरकुले, यामुळे सामान्य ठाणेकरांनाही त्यांच्या आयुष्यात काही दिलासादायक घडेल असे वाटू लागले आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प असो की क्लस्टर योजना, यांना मूर्त स्वरुप मिळावे ही ना.आव्हाड यांच्याकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्षात असताना ते या विषयावर सर्वाधिक आक्रमक होते आणि त्यामुळे त्याच हिरीरीने हा प्रश्न ते मार्गी लावतील ही गोरगरीब शहरवासीयांची अपेक्षा आहे.
एका सुशिक्षित आणि मध्यमवर्गात जन्माला आलेल्या तरुणाला मंत्रीपद मिळते, हे महाराष्ट्रातील पुरोगामीपणाचे यश आहे. ते साजरा करताना याच मध्यमवर्गीयांना असलेल्या अपेक्षांची पूर्तता कशी होईल हे ना. आव्हाड यांना पहावे लागणार आहे. या वर्गात मंत्र्यांची प्रतिमा फार गोडगोजिरी नसते. तिला नकारात्मकतेच्या छटा असतात. अशा वेळी ना. आव्हाडांना आपला मूळ रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तसेच मंत्रिपदाचे सारे अनुभव गोड नसतात. काही मन:स्ताप देऊनही जातात. त्याचा अनुभव ना. आव्हाड यांनी अलिकडेच घेतला. ना. आव्हाड हे जरी श्री. शरद पवार यांना गुरुस्थानी मानत असले तरी प्रत्यक्ष रणांगणात त्यांना स्वपक्षीय आणि विपक्ष यांच्याशी एकट्यालाच मुकाबला करावा लागत आहे. त्यावर ते मात करीत आहेत. शिकत, ठेचकाळत ते पुढे निघाले आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.