श्री. शरद पवार यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत आठ राजकीय पक्षांच्या (दुय्यम नेत्यांच्या) बैठकीत ‘राष्ट्रीय मंच’ व्यासपीठ स्थापन करण्यात आले. विरोधी पक्षांचे असे एकत्र येणे राजकीय निरीक्षकांच्या मते लक्षणीय आहे आणि तशीच दखल माध्यमांनी घेतली. केंद्रातील राष्ट्र लोकशाही आघाडी सरकारला आव्हान देण्यासाठी तिसर्या आघाडीची ही सुरूवात असल्याचे बोलले जाऊ लागले असतानाच त्यास राष्ट्र मंचाने मात्र दुजोरा दिलेला नाही. भाजपाला एक ‘विश्वासार्ह पर्याय’ देण्यासाठी चाचपणी सुरू आहे, असे सांगितले गेले. मंचाच्या या बैठकीत काँग्रेस समाविष्ट नव्हती. त्यामुळे यदाकदाचित तिसरी आघाडी प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरली तर तिला मते फुटण्याची भीती असणार आणि भाजपाच्या ते पथ्यावर पडणार. काँग्रेसकडून स्वबळाची भाषा बोलली जात असल्यामुळे ते तिसर्या आघाडीत सामील होणार नाही, हे स्पष्ट होते. परंतु तसे करण्यासाठी काँग्रेसला नेतृत्वाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा लागले. राष्ट्र मंचच्या स्थापनेस काँग्रेसमधील नेतृत्व ठरवण्यातील दिरंगाई कारणीभूत आहे. ज्या अर्थी मंचात काँग्रेस नाही त्या अर्थी काँंग्रेसचा ‘विश्वासर्हते’बद्दल शंका आहे, असाही अर्थ निघू शकतो.
भाजपाला २०२४ मध्ये टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र येण्याखेरीज पर्याय नाही. नरेन्द्र मोदी यांना पराभूत करणे आता एकट्या-दुकट्याचे काम राहिलेले नाही. श्री. पवार यांनी हे ओळखल्यामुळेच त्यांनी हा प्रपंच मांडलेला दिसतो. काँग्रेसला बरोबर घेतले तर विश्वासार्हता राहणार नाही. असे तर मंचच्या नेत्यांना वाटत नसेल? पण राजकीय पक्ष विश्वासार्ह आहे की नाही हे कोण ठरवणार हाही प्रश्नच आहे. जनतेच्या नजरेत साऱ्याच पक्षांच्या प्रगतीपुस्तकांत विश्वासार्हता या विषयासमोर शुन्य गुण आहेत. असे अनेक शुन्य एकत्र आले तर त्यांची बेरीजही शुन्यच होणार! त्यामुळे मंचाचा हेतू हा स्पष्ट असायला हवा. त्यांनी भाजपाला शत्रू मानून रणशिंग फुंकायला हवे. मंचच्या दिल्लीच्या बैठकीतून जेमतेम पिपाणीचा आवाज आला. लोकांची मने जिंकायची असतील तर त्यांचा विश्वास संपादन करायला हवा. सत्तारूढ पक्षाच्या मर्यादा शोधून त्यावर जनतेच्या अपेक्षांना उतरणारे काम करून दाखवावे लागणार. केवळ टीका करून विश्वासार्हता संपादन होणार नाही. त्याला ठोस कृतीची जोड हवी. लोकाभिमुख पर्याय द्यायचा असेल तर लोकांच्या हिताचा अजेंडा ठरवावा लागेल. असा कार्यक्रम मंचने जाहीर केला तरच त्यांची गंभीर दखल घेतली जाईल. विश्वासार्ह पर्याय शोधण्यातले हे पहिले पाऊल असेल.