रस्ते, पूल, उद्याने, विमानतळे गेल्या बाजार गल्लीबोळांना आपल्या नेत्याचे नाव देण्यात ज्या देशातील कार्यकर्त्यांची ह्यात गेली, त्या देशात शाळांना चक्का ऑलिम्पिक खेळाडूंची नावे देण्याची टूम निघाली असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. पंजाब राज्य सरकारने दहा सरकारी शाळांना अलिकडेच टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकवणार्या हॉकी संघातील दहा खेळाडूंची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे स्वागतच करायला हवे.
पंजाब सरकारने देशाचे नाव मोठे करणार्या खेळाडूंचा सन्मान केला आहे. विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन या विजयवीर खेळाडूंचा कित्ता गिरवावा हा उदात्त हेतू या नामकरण योजनेमागे आहे, यात वाद नाही. अर्थात ही सुपीक कल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्याचे कौतुक करायला हवे. अर्थात काही जणांना या निर्णयामागेही राजकारण दिसेल. कारण या राज्यात आता निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे जनतेचे मन जिंकण्यासाठी ही क्लुप्ती तर लढवण्यात आली नसावी अशी शंका विरोधक घेऊ शकतील.
आपल्या देशात प्रत्येक निर्णयामागे राजकीय हेतू शोधण्याची सवय जडल्यामुळे हेतू हे युध्द असू शकतात यावर विश्वासच राहिलेला नाही. पण या सवयीला मुरड घालून खेळाला प्रोत्साहन देण्याची योजना असावी असा विचार करायला हवा. या ऑलिम्पिक स्पर्धेतील एक वैशिष्ट्य असे होते की अनेक पदकविजेते अत्यंत गरीबीतून, दुर्गम खेड्यातून कोणत्याही सुविधा नसलेल्या भागातून, प्रचंड मेहनत आणि जिद्द दाखवून देशाचे नाव उज्ज्वल करुन गेले अशा खेळाडूंमध्ये अंगभूत आणि उपजत असे गुण असल्यामुळेच त्यांच्या हातून उल्लेखनीय कामगिरी झाली. त्यांच्या कामगिरीमुळे अचानक संपूर्ण देशाचा खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. क्रिकेटमध्ये रममाण झालेली मुले भालाफेक, नेमबाजी, कुस्ती, कबड्डी आदी खेळांकडे वळली तर आश्चर्य वाटू नये. त्यांच्या डोळ्यासमोर चांगले आदर्श सदैव रहावेत म्हणुन शाळांनाच खेळाडूंची नावे देणे म्हणुनच स्वागतार्ह आहे.
इतिहासातील वीरपुरुष असतील किंवा स्वातंत्र्यसैनिक यांच्याबद्दल देशाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. परंतू जे काम या महापुरुषांनी समाजजीवनात केले तेच काम खेळाडू क्रीडाक्षेत्रात करीत आहेत. त्यांचा यथिचित गौरव व्हायलाच हवा. परंतु केवळ नाव देऊन आपली जबाबदारी संपली असे मात्र सरकारने मानता कामा नये. त्यासाठी क्रीडाक्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याचीही तरतुद ठेवायला हवी. पंजाब सरकारने तोही पायंडा पाडून क्रीडा-क्रांतीची सुरूवात करावी.