मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना नगरसेवकांनी पाच वर्षात बजावलेली कामगिरी फार आशादायक नसल्याचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने सादर केला आहे. कोरोनामुळे एका वर्षाची कामगिरी नोंदवणे नगरसेवकांवर अन्यायकारक ठरेल म्हणून 2017 ते 2021 असा चार वर्षांचा कालखंड निवडण्यात आला. त्यात 31 नगरसेवकांनी एकदाही तोंड उघडले नसल्याचे पुढे आले आहे तर 90 टक्के नगरसेवकांची कामगिरी निराशाजनक आहे, असाही अनुमान निघाला आहे. एकुण 220 नगरसेवकांपैकी दोघे ’अ‘ श्रेणीत तर 20 जण ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बाकी 127 नगरसेवक ‘क’ आणि ‘ड’ तर 71 नगरसेवक ‘ई’ आणि ‘फ’ श्रेणीत जेमतेम उत्तीर्ण झाले आहेत. प्रजा फाऊंडेशनतर्फे प्रगती पुस्तक तयार केले जात असते आणि त्यात सरासरी गुण घटल्याचे निष्पन्न झाले आहे. मागच्या सभागृहात (2012 ते 2016) 58.92 टक्के सरासरी होती ती 55.10 टक्के झाले आहे.
आपण निवडून दिलेले नगरसेवक काय काम करतात हे जनतेला सहसा समजत नाही. निवडणुकीपूर्वी गुळगुळीत कागदावर प्रसिध्द होणारा कार्यअहवाल हा धूळफेकीचा प्रकार असतो आणि मतदारांना फसवून पुन्हा निवडणुका जिंकल्या जात असतात. परंतु प्रजा फाऊंडेशनमुळे नगरसेवकांना आता अशी थापेबाजी करता येणार नाही.
जनतेनेही हे अहवाल मतदान करताना विचारात घ्यायला हवेत. अन्यथा फाऊंडेशनचे प्रयत्न पाण्यात जातील.
नगरसेवक आपल्या प्रभागात काय काम करतो, समस्यांबाबत कसा आवाज उठवतो. जनतेच्या अपेक्षा आणि प्रयत्न पुरविण्यात येणार्या नागरी सुविधा यामध्ये काही मेळ असतो का, त्याचा पाठपुरावा, जनसंपर्क, सार्वजनिक वर्तन आदी बाबी आदींबाबत आम जनता अनभिज्ञ असते. ते या अहवालांमुळे उघडकीस येत असते. नागरीकांनी जागरुकपणे मतदान केले तर चांगली माणसे निवडून येतील आणि शहराचे भले होईल. अज्ञानातून झालेल्या मतदानामुळे शहरे बकाल का होतात याचे उत्तर मिळते. पण मतदारांनी त्यासाठी उदासिनता सोडली पाहिजे आणि स्मरणशक्ती शाबूत ठेवायला हवी.