लाखांत एक उमेदवार!

लोकसभा निवडणुकीने वातावरण तापत चालले आहे आणि निकालापर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. देशातील काही लढतींकडे मतदारांचे बारीक लक्ष असणार आहे तर जे निवडणूक- विशेषज्ञ आहेत ते राज्या-राज्यातील निकालांची भवितव्ये सांगून जनतेमध्ये राजकीय कुतूहल वाढवत आहेत. क्रिकेट पाठोपाठ अन्य कोणता खेळ अनिश्चितता या विशेषणाला सार्थ ठरत असेल तर ते राजकारण आहे. राजकारण खेळ मानावा लागेल कारण बहुतांश वेळा तो सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा खेळ-खंडोबाच करीत असते! असो.

आमचे लक्ष मात्र ओडिशा राज्यातील कोरापूर मतदारसंघाकडे राहणार आहे. तेथून कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रमिला पुजारी निवडणूक लढवत आहेत. कला शाखेच्या पदवीधर असणाऱ्या या पुजारींच्या निवडणुकीबद्दल कुतूहल निर्माण होण्याचे कारण असे की या २५ वर्षीय तरुणीने निवडणूक आयोगाकडे अर्जासोबत सादर केलेल्या उत्पन्नविषयक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे फक्त २०,६२५ रुपये एवढेच आहेत. आता इतक्याशा पैशात त्या ग्रामपंचायतीची तरी निवडणूक लढवू शकतील का? पण त्या तर खासदार होऊन देशाच्या सर्वोत्तम संसदीय मंडळात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. आणि तेही पदरी फक्त २०,६२५ रुपये असताना!

पुजारी यांच्यासमोर धनाढ्य उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांचा कितपत टिकाव लागेल हे सांगणे कठीणच आहे. नाही म्हणायला पक्षाने प्रचारासाठी एक वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यात दररोज इंधन भरायचे ठरवले तर २० हजार रुपये काही दिवसांतच संपून जातील. मग कार्यकर्त्यांसाठी चहा-पान, व्होटर-स्लिपची छपाई, थोड्याफार प्रचारसाहित्याची खरेदी वगैरे अनिवार्य खर्च या पुजारीबाई कुठून करणार आहेत? त्यांना तरीही जिंकण्याची आशा आहे आणि का असू नये? स्वप्न पाहायला का पैसे लागत असतात?

लोकसभेची खर्चिक निवडणूक आणि ती लढवणारे ‘श्रीमंत’ उमेदवार हे चित्र काश्मीरपासून-कन्याकुमारीपर्यंत असताना फक्त २० हजार रुपये असणारा उमेदवार निवडणूक लढवण्याचा विचारच करू शकतो? या प्रश्नातच लोकशाहीची महानता लपली आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा जसा अधिकार आहे तसा निवडणूक लढवण्याचा सुद्धा! देशाची सेवा करण्याचे ध्येय उरी बाळगून पुजारी यांच्यासारखे उमेदवार निवडणूक लढवू पाहत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये! त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे, त्यांना समजून घ्यायला हवे, त्यांच्या भावी योजनांचा आणि दृष्टीचा आदर करायला हवा. केवळ खिशात पैसा नाही म्हणून गरिबातला गरीब उमेदवार लोकसभेत जाण्याचे स्वप्न पाहू शकणार नसेल तर आपली लोकशाही बेगडी आहे असे म्हणावे लागेल. त्यांच्या मनातील लाखमोलाच्या देशसेवेच्या भावना, मतदारांना मिळालेला मतदानाचा लाखमोलाचा अधिकार आणि लाखमोलाची लोकशाही, यांची किंमत एकाही पैशाची देवाणघेवाण न होता ठरली होतीच ना? मग ओडिशातील या महिला उमेदवाराला मतदार काय कौल देतात हे पाहावे लागेल. त्या लाखांत एक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये!