मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांच्यात दिलजमाई ?

ठाणे : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कितीही दुरावा आला तर ते पुन्हा मैत्रीत रूपांतर होत असते. असेच काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यात झाले असून त्यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याची माहिती हाती आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची जुनी मैत्री सर्वश्रूत आहे. राजकीय विरोधक असले तरी ऐन निवडणुकीत या दोघांनी एकमेकांना नेहमीच मदत केली आहे. पूर्वी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांची जशी मैत्री होती तशीच. या मैत्रीने गेली अनेक वर्षे भाजपला ठाण्यात हातपाय पसरू देण्यापासून रोखले होते. लोकसभा निवडणुकीत आव्हाड यांनी शिंदे यांना छुपी मदत करायची आणि त्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत कमजोर उमेदवार देऊन आव्हाडांच्या विजयाचा मार्ग मोकळा करायचा, हे आता लपून राहिले नाही. पण यावेळी परिस्थिती थोडी बिघडली होती. मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विकासकामांवरून अनेक खटके उडू लागले. ते अनेकवेळा चव्हाट्यावरही आले. पण ज्यावेळी मुंब्रा उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली.

हा वाद इतका विकोपाला गेला की ही प्रतिष्ठेची लढाई झाली. यामधून आव्हाड यांच्यावर गंभीर गुन्हेही दाखल झाले. त्यानंतर आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. शिंदे यांचे उघड शत्रूत्व पत्करले. पण अचानक आव्हाड यांची भूमिका ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मवाळ झाली असल्याने राजकीय विश्लेषकही हैराण झाले आहेत. नुकत्याच खारभूमी मैदानावरून झालेल्या वादाच्या पत्रकार परिषदेत आमदार आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करून मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विषयी स्तुतीसुमने उधळली होती. त्यावरून अनेक अंदाज बांधले जात असतानाच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हाडांकडे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील मतांवर महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे या मतदार संघांचे आमदार डॉ आव्हाड यांच्यावर आघाडीच्या उमेदवाराची भिस्त आहे ते या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे आव्हाड सध्या मवाळ झाले आहेत. नुकतीच महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि खा. राजन विचारे यांनी डॉ. आव्हाड यांची भेट घेतली होती पण त्या आधी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याबरोबर त्यांची दिलजमाई झाल्याने आव्हाड मैत्री निभावणार कि आघाडीचा धर्म पाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.