देशातील करोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रणजी करंडक, कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धांसह आणखी काही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला १३ जानेवारीपासून प्रारंभ होणार होता. परंतु शिवम दुबेसह मुंबईच्या काही खेळाडूंना तसेच बंगालच्या पाच खेळाडूंसह सहा जणांना करोनाची लागण झाल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे सचिव अविषेक दालमिया यांचीसुद्धा करोना चाचणी सकारात्मक आली आहे.
‘‘खेळाडू, मार्गदर्शक आणि सामनाधिकारी यांच्या आरोग्याशी ‘बीसीसीआय’ मुळीच तडजोड करणार नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी रणजी, सी. के. नायडू आणि वरिष्ठ महिला ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा यंदा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ‘बीसीसीआय’ परिस्थितीचा आढावा घेत असून, योग्य वेळी स्पर्धांचा निर्णय घेऊ,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी सांगितले.
‘बीसीसीआय’ने अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, थिरुवनंतपूरम, बेंगळूरु आणि कोलकाता अशा सहा शहरांमध्ये जैव-सुरक्षित परीघाची निर्मिती केली होती. मुंबईचा संघ कोलकाता येथे दाखल झाला होता.
राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा पुढे ढकलली
इंदूर : भारतीय टेबल टेनिस महासंघाने (टीटीएफआय) ११, १३ आणि १५ वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त २२ ते २९ जानेवारीदरम्यान शिलाँग येथे होणारी वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धासुद्धा लांबणीवर पडली आहे. कनिष्ठ (१८ वर्षांखालील) आणि युवा (२१ वर्षांखालील) वयोगटाच्या फेब्रुवारीत होणाऱ्या स्पर्धेबाबत अद्याप महासंघाने निर्णय घेतलेला नाही.
निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा स्थगित
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजी संघटनेने रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या तिन्ही प्रकारांतील निवड चाचणी स्पर्धा स्थगित केल्या आहेत. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह नेमबाजी केंद्रावर १३ ते २५ जानेवारीदरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार होते.