कंत्राटदाराला दाखवला काळ्या यादीचा ‘रस्ता’

कोपरीत निकृष्ट दर्जाचे काम महापालिका आयुक्तांचे कारवाईचे निर्देश

ठाणे : नागरिकांच्या तक्रारीनुसार शनिवारी ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अचानक भेट देऊन कोपरी येथील सिद्धीविनायक चौकाच्या कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. यामुळे शहरात काम करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे शहरातील रस्ते, विविध विकास कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालिका आयुक्त श्री. बांगर पाहणी करीत असून आज त्यांनी कोपरीतील अष्टविनायक चौक तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी, कळवा, साकेत परिसरात सुरू असलेल्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामांचा आढावा घेतला. अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली होती. कार्यकारी अभियंत्यांनी खुलासा करताना सांगितले की, कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केले असून त्या कामाचे देयक अदा करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आज आयुक्तांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. सदर पाहणी दौ-यात कामाचा दर्जा निकृष्ट करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा समावेश काळ्या यादीत करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांना समज देण्यात आली. जरी कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केले तरी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. त्यामुळे कंत्राटदाराने परस्पर काम केले हा अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. याबाबत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकल्याचा कार्यकारी अभियंत्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधितांचा खुलासा मागवून पुढील कार्यवाही करण्यात आली.

कोपरी येथील गणेश विसर्जन घाटाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी महत्त्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोपरी परिसरात उभारण्यात येणारे सभागृह व वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचे उर्वरीत काम एक महिन्याच्या आत पुर्ण करा, तसेच येथे असणारे निर्माल्य कलश अस्ताव्यस्त असून ते तातडीने सुस्थितीत ठेवण्यात यावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कळवा वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या.
साकेत येथील वॉटर फ्रंटच्या पाहणी दरम्यान तेथील गार्डनमधील जॉगिंग ट्रॅकच्या कोपऱ्यांची कामे सुयोग्य पध्दतीने झालेली नाहीत, ती सुयोग्य पध्दतीने करण्याच्या सूचना दिल्या.

१६ क्रमांकाच्या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम

ठाण्यातील रोड नं. १६ पेट्रोल पंप शेजारी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरु असून तेथे कोणत्याही प्रकारे रस्ता न खोदता केवळ रस्त्याचे पेव्हर ब्लॉक काढून ३ ते ४ इंच भरण्याचे काम सुरू आहे, अशी तक्रार मनविसेचे ठाणे जिल्हा सचिव सचिन सरोदे यांनी महापालिकेकडे २१ डिसेंबर रोजी केली होती. स्लॅब भरताना पी. सी. सी. करण्यात येत नसल्याने भविष्यात रस्त्याला तडे जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्त्याला तडे गेलेले आहेत. स्लॅब भरताना ठाणे महापालिकेचे कोणतेही अधिकारी त्या ठिकाणी नसतात. अशा विविध त्रुटी सरोदे यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.