आयुक्त बांगर यांनी साधला ‘श्रीरंग’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

ठाणे : विद्यार्थी दशेपासूनच चांगल्या सवयी अंगीकारल्या गेल्या तर जबाबदार आणि सुजाण नागरिक प्रत्येक शहराला लाभतील, असे मत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
येथील श्रीरंग विद्यालयात भरवण्यात आलेल्या ऊर्जा आंतरशालेय विज्ञान स्पर्धा आणि प्रदर्शनात विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. संस्थेचे अध्यक्ष आणि ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ अध्यक्षस्थानी होते. श्री. बांगर यांनी जवळजवळ पाऊण तास मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यात प्लास्टिकचा उपद्रव, कचऱ्याची समस्या, वाहतूक कोंडी, प्रदूषण, रस्त्यांचे रुंदीकरण, तलावांचे संवर्धन, रस्त्यांवरील खड्डे आदी विषयांवर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्तांनी त्यांना समजतील अशा भाषेत उत्तरे दिली. ओला-सुका कचऱ्याचे विभाजन असो की सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व, हे विषय सोप्या भाषेत सांगून श्री. बांगर यांनी महापालिका यंत्रणेची थोडक्यात माहिती दिली.
‘ऊर्जा’निमित्त शाळेच्या पटांगणात ‘तलावाचे शहर-ठाणे’ हा देखावा उभारण्यात आला होता. त्याचे उद्घाटन श्री. बांगर यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून श्री. बांगर यांनी शुभेच्छा दिल्या. शिळफाटा येथील कचरा प्रक्रिया केंद्राला भेट देण्याचे आमंत्रण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. आपण अशा प्रकारच्या देवाणघेवाणीचे स्वागत करू असेही ते म्हणाले.