ठाणे : मंगळवारी श्रावण सुरु होणार असल्याने सुट्टीच्या दिवशी रविवारी (१६ जुलै) रोजी ठाण्यात गटारीसाठी मोठी झुंबड उडालेली होती. रविवारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कलम १८५ आणि वाहतूक नियम १८८ कलमानुसार नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ९४ वाहन चालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
मंगळवारी श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. तर दुसरीकडे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश लोकांनी रविवारीच गटारी साजरी करण्याचा बेत आखला होता. दरम्यान गटारीसाठी हॉटेल्स, ढाबे, येऊर परिसरात मोठी जत्रा भरल्याचे चित्र होते. तर ठाणे पोलिसांसह ठाणे वाहतूक पोलिसांनीही गटारीत मद्य प्रश्न करून वाहन चालवून अपघातासारखी अप्रिय घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
संभावित ठिकाणी वाहतूक पोलिसांनी तपासणी पथके तैनात केलेली होती. रविवारी ठाणे वाहतूक विभागाच्या पथकांनी ठाण्यात वाहतूक नियम १८५ नुसार मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७२ वाहन चालकांवर कारवाई केली. तर वाहतूक नियम १८८ नुसार वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या २२ वाहन चालकांवर पोलीस पथकांनी कारवाई केली. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे आणि वाहतुकीचे नियम उल्लंघन करणाऱ्या एकूण ९४ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाने दिलेली आहे.