डोंबिवली : प्रवास करताना रेल्वे गाडीतून पडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी एकाचे नाव समजले असून दुसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नसल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.
याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी रात्रीच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दरवाज्याला लटकत एका प्रवाश्याला लोकलजवळील पोलचा जोरदार फटका बसला. यात तो प्रवासी रेल्वे गाडीतून खाली पडला. पोलचा फटका लागल्यान त्या प्रवाशाचे रक्त लोकलमध्ये पडले. त्याच डब्ब्यातील एक महिला प्रवासीने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी माहिती दिली. यात अपघात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव पोलिसांना समजू शकले नाही.
दुसऱ्या घटनेत गुरुवार २ जून रोजी सकाळी ८ वाजता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून एका प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाला. मनोज शंकर म्हात्रे ( ४०) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्याचे नाव आहे. म्हात्रे याचा मृतदेह दोन रेल्वे रुळामध्ये पडलेल्या अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळून आला. यावरून हा प्रवासी रेल्वेतून पडून मृत्यू पावल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.