भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची विसर्जन मिरवणुकीत हाणामारी

नवी मुंबई : मुंबईत प्रभादेवी परिसरात अनंत चतुर्दशीच्या रात्री शिंदे गट आणि शिवसैनिक आमने सामने आले होते. आज दिवसभर त्या वादाची चर्चा सुरु होती. नवी मुंबईत काल गणपती विसर्जन मिरवणुकीत भाजप आणि शिवसेना गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यापुढे वाद निर्माण होऊन त्याचं रुपांतर मारहाणीत झालं.

नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये काल गणपती विसर्जन मिरवणुकीत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट एकमेकांसमोर आले होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळं वाद नि्र्माण झाला. या वादाचं रुपांतर मारामारीत झालं. दोन्ही गटातील वाद लाठ्या काठ्या घेऊन मारहाणीत करण्यापर्यंत पोहोचला.

नवी मुंबईतील भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीची दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या ३ माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक एम.के मढवी, माजी नगरसेवक करण मढवी आणि माजी नगरसेविका विनया मढवी यांच्यासह १० ते १५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलीस आणखी कुणावर कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

गणेशोत्सवाला वादाचं गालबोट

करोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर यंदा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांमध्ये करोनाचं संकट असल्यानं सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी देखील स्वत: सर्व सण मर्यादित स्वरुपात साजरे केले होते. यावर्षी करोनाचं संकट कमी झाल्यानं गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. मात्र, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वादानं सणाला गालबोट लागल्याचं म्हटलं जात आहे.