नवी मुंबई -:नवी मुंबईतील वाशी जुहू चौपाटी येथे उघड्यावर जैविक कचरा फेकून दिल्याची बाब समोर आली आहे.तर या कचऱ्यात नवी मुंबई महानगर पालिका आरोग्य विभागाचे कागदपत्रे देखील आढळून आली आहेत.त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पालिका रुग्णालय आणि नोंदणीकृत इतर खासगी रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा अर्थात, बायोमेडिकल वेस्टची व्हिल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेला रुग्णालयातील जैविक कचरा नेऊन तांत्रिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आले आहे.जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे संबंधित शासकीय खासगी रुग्णालय आणि त्या डॉक्टरांची जबाबदारी आहे. आणि हीच नियमावली खाजगी क्लिनिक ना देखील असून ठरवून दिलेल्या संस्थेकडे त्यांनी हा कचरा देणे आवश्यक आहे. डॉक्टर वा रुग्णालयांनी जैविक कचरा हा सार्वजनिक ठिकाणी टाकला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. प्रसंगी क्लिनिक वा दवाखाना बंदही केला जाऊ शकतो. मात्र अशी नियमावली असून देखील वाशी जुहू चौपाटीवर जैविक कचरा टाकल्याची बाब समोर आली आहे. आणि या कचऱ्यात नवी मुंबई महानगर पालिका आरोग्य विभागाचे काही कागदपत्रे देखील
आढळून आली आहेत.जुहू चौपाटी हे नवी मुंबईतील एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.आणि या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते.आणि अशा कचऱ्याला जर कुणाचा स्पर्श झाला तर नागरी आरोग्याला घातक ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे आरोग्य विभागाने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
—————————— ———-
जुहू चौपाटीवर आढळून आलेला कचरा आणि कागदपत्रे ही वाशीतील मनपा रुग्णालयातील नसून एखाद्या नागरी आरोग्य केंद्रातील असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.तरी देखील याची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. प्रशांत जवादे,
अधीक्षक,मनपा रुग्णालय वाशी.