ठाण्यासह मुलुंड, कल्याण आणि डोंबिवलीत बत्ती गुल

आधीच भारनियमन त्यात पडघा उपकेंद्रात बिघाड

ठाणे : पडघा येथील महापारेषणच्या ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल २२० केव्ही उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या ठाणे व मुलुंड येथील काही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. आधीच उन्हाची काहिली होत असताना वीज खंडित झाल्याने उकाड्याने सारेच हैराण झाले.

ठाण्यासह इतर भागात महावितरणकडून भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्याचा फटका नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात सोमवारी रात्री देखील घोडबंदर भागातील अनेक भागांचा वीज पुरवठा सुमारे पाऊण तास खंडीत झाला होता. त्यानंतर सकाळी अचानक वीज पुरवठा पुन्हा खंडीत झाल्याने नागरीक हैराण झाले. सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे चांगलेच हाल झाले. सकाळी १०.०८ च्या सुमारास पडघा येथील महापारेषणच्या ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्याने पडघा ते पाल २२० केव्ही उच्चदाब वाहिनीवर वीज पुरवठा असणाऱ्या महावितरणच्या ठाणे व मुलुंड येथील अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत झाला. परंतु अवघ्या अर्ध्या तासात येथील बिघाड दुरुस्त करण्यात येऊन टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

कल्याण-डोंबिवली भागातील वीज पुरवठा अर्ध्या तासाने सुरळीत झाला. त्यानंतर सर्व सबस्टेशनचा वीज पुरवठा ११.०८ च्या सुमारास रिस्टोर करण्यात आल्याची माहिती महापारेषणच्या वतीने देण्यात आली. परंतु त्यानंतर टप्याटप्याने शहरातील भागांचा वीज पुरवठा सुरळीत झाला. घोडबंदर आणि शहराच्या काही भागांचा वीजपुरवठा दुपारी १ नंतर सुरळीत झाल्याचे दिसून आले. आधीच सुरु झालेले भारनियमन त्यात बिघाडाने नागरिकांच्या हालात आणखी भर पडली.