टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात साकारतेय अयोध्येचे श्रीराम मंदिर

Thanevaibhav Online

14th October 2023

ठाणे: जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. ठाणेकरांबरोबरच शेजारील शहरांतील भाविकांसाठी हा उत्सव यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रौत्सव देशभर प्रसिध्द आहे. स्व. आनंद दिघे यांनी जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या या नवरात्रौत्सवाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे.

टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अयोध्येचे श्रीराम मंदिर होय. नागर शैलीवर आधारीत हे मंदिर पूर्णपणे फायबरचे असून ग्लास, स्टील, लाकडी फळ्या, ऑईल पेंट आदि सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे.

मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका ठाणे अशा सहा ठिकाणी काम सुरु असून, अंदाजे ३५० कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. प्रामुख्याने यामधील काम हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व कलकत्ता येथील आहेत.

मंदिराचा मुख्य गाभारा 40 x 40 फुट मोजमापाचा आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठूमाऊली व श्री सत्यनारायणाचे दर्शन भाविकांना होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

संपूर्ण कोरलेले 40 x 60 फुटाचे छत असून, एकूण 32 छोटे-मोठे कोरीव खांब या मंदिराचा डोलारा उलचून धरणार आहेत. 64 कोरीव कमानी एकंदरीत गाभाऱ्याची व सभामंडपाची आकर्षक मूर्तींसह मंडपाची शोभा वाढविणार आहेत. माँ दुर्गेचे मखर पूर्णपणे सुवर्णांकित असून, त्याची उंची 18 फुट तर 14 फुट लांबी व 10 फुट रुंद आहे. मंदिराची शोभा वाढविण्यासाठी नक्षीकाम असलेल्या कार्पेट सोबतच झुंबर व आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.
बाहेरील बाजूस सहा फुटी उंचीचे दोन गरुड स्वागतासाठी उभे असतील तर सात छोटे-मोठे कळस व एक मुख्य कळस उभारण्यात येणार असून भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम करत 101 फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न करतील.

बाहेरील रस्त्यारील मुख्य कमानी वानरसेनेचे दर्शन घडविणारे असल्यामुळे आपण श्रीरामांच्या नगरीत असल्याची निश्चितच अनुभूती भाविकांना होईल, असेही खासदार श्री. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेस जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, भालचंद्र घुले, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण, अनिल सोनावणे, संतोष घुले, संजय रवळेकर, नितीन बुडजडे आदी उपस्थित होते.