नवी मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघा एक आठवड्याचा काळ राहिला असून नवी मुंबईतील गणपती कारखान्यांमध्ये आकार घेतलेल्या गणरायाच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवताना दिसून येत आहेत. यात मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून रंगकाम करणाऱ्या कामगारांनाअतिरित्त मेहनत करावी लागत आहे.
विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठा सजल्या असून बाजारात तयार मूर्तीचे अनेक कला केंद्र सुरू करण्यात आले आहेत. बाजारात तयार मूर्ती जर उपलब्ध असल्या तरी येथील पारंपारिक आणि स्थानिक गणेशभक्त आजही आपल्या जुन्याच मूर्तिकाराच्या हाताने मूर्ती घडवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आज जरी नवी मुंबईत हाताच्या बोटावर मोजण्या इतके गणपती कारखाने शिल्लक असले तरी आपल्या जुन्या ग्राहकांसाठी मूर्तीकारांनी आपली कला जिवंत ठेवत कारखाने चालवत आहेत.
नवी मुंबईत दारावे, तुर्भे, बोनकोडे, कोपरखैरणे, ऐरोली आदी ठिकाणी आजही असे कारखाने अपुरी जागा असताना आपल्या व्यवसायात तग धरून आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच घरगुती गणपतीची बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्याच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार राबत आहेत. कारखान्यात दिवसरात्र काम सुरू असून गणपतीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवणे, मूर्तीवर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे, आदी कामे कामगार करीत आहेत, अशी माहिती नवी मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष चौलकर यांनी दिली.