एका जाहिरात होर्डिंगने अडवली भिवंडी मेट्रोची वाट

ठाणे : एका जाहिरात होर्डिंगने गेली दोन वर्ष भिवंडी मेट्रोची वाट अडवली आहे. बाळकूममधील या होर्डिंगमुळे दोन वर्षांपासून मेट्रोचे काम पुढे सरकलेले नाही. होर्डिंग मालकांना नोटीस देऊनही अद्याप होर्डिंग हटवण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाची घोषणा करण्यात आली होती. ही उन्नत मार्गिका ठाण्यातील कापूरबावडी येथून ठाणे-भिवंडी रस्त्याने भिवंडी शहरात राजीव गांधी चौक, भिवंडी येथून कल्याण रस्त्याने रांजणोली ते दुर्गाडीपर्यंत व त्यापुढे कल्याण शहरातून कल्याण शीळरोडमार्गे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयापर्यंत प्रस्तावित आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामातील पहिल्या १२.७ किलोमीटर लांबीचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यात भिवंडी ते कल्याणमधील भिवंडी शहरात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदीर, टेमघर या सुमारे तीन किलोमीटर अंतरात मोठय़ा प्रमाणात पुनर्वसन व पुनर्वसाहतीची कामे करावी लागणार आहेत. यात सुमारे १,५९७ बांधकामे निष्कासित करावी लागणार आहेत. तर यासाठी रस्ता रूंदीकरणाकरिता १८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.त्यामुळे या टप्यातील स्थापत्य कामास अजूनही सुरुवात झालेली नाही. निष्कासन आणि भूसंपादन यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते. त्यामुळे सल्लागारांच्या अहवालानंतर हा मार्ग भूमिगत करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे. हा मार्ग भूमिगत केल्यास हटवल्या जाणाऱ्या घरांची संख्या १,५९७ वरून ८६२ वर येणार आहे.

दुसरीकडे भिवंडी मेट्रोचे इतर पट्ट्यातील काम प्रगतीपथावर असले तरी ठाण्यातील एका जाहिरात होर्डिंगमुळे मेट्रोचे काम गेल्या दोन वर्षांपासून पुढे सरकलेले नाही. मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या एका इमारतीवर कारवाई झालेली आहे. तर आणखी एका इमारतीवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी असलेले होडींग मात्र अजून काढण्यात आलेले नाही.

ठाणे महापालिकेने होर्डिंग काढण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. मात्र महिनाकाठी लाखो रुपयांचा महसूल या होर्डिंगच्या माध्यमातून मिळत असल्यानेच अद्याप ते हटवण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे.