मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी भाजपसह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. तो सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत येणार आहेत. ते निरीक्षक म्हणून मुंबईत येत आहेत. तेच मुख्यमंत्रिपदाबद्दल घोषणा करतील. मंत्रिपदांच्या वाटपाचा विषयदेखील शहाच मार्गी लावणार आहेत.
महायुतीमधील मित्रपक्षांना सत्तेत वाटा देण्यासाठी भाजप नव्या सरकारमध्ये दोघांना उपमुख्यमंत्रिपद देईल. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजपनं वापरलेला फॉर्म्युला चर्चेत आहे. तिकडे भाजप नेतृत्त्वानं भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपद दिलं. शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले होते. त्यांना थेट मुख्यमंत्री करण्यात आलं. तशाच प्रकारे भाजप एका नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतो.
भाजपला महाराष्ट्रात मध्य प्रदेशप्रमाणेच तीन चतुर्थांश बहुमत मिळालं आहे. मध्य प्रदेशात भाजपनं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना हटवून मोहन यादव यांच्याकडे धुरा सोपवली. यादव त्याआधी सिंह यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्याच प्रकारे एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्रिपदी बढती मिळू शकते.
तिसरा फॉर्म्युला बिहारचा आहे. बिहारमध्ये २०२० मध्ये एनडीएला बहुमत मिळालं. निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांचे ४३ उमेदवार निवडून आले. पण भाजपनं कुमार यांना दिलेलं आश्वासन पाळलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. राज्यात महायुती शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभा लढली आहे. त्यामुळे बिहार पॅटर्नच्या आधारे शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात.