ठाणे: ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांचा आदर्श निर्माण करणाऱ्या ज्युपिटर रुग्णालयाने डोंबिवलीतीही ५०० रूग्णशय्यांची क्षमता असलेले रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम भारतावर लक्ष केंद्रित केलेल्या ज्युपिटर हॉस्पिटल्सकडून डोंबिवलीत तिसरे रुग्णालय विकसित केले जात आहे. ५०० हून अधिक रूग्णशय्यांचे हे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय पूर्णपणे अंतर्गत स्रोतातून उभे केले जात आहे. शिवाय पुढील तीन ते पाच वर्षांत आणखी तीन ते चार नवीन रुग्णालये श्रृंखलेत जोडण्याची कंपनीची योजना असल्याचे डॉ. ठक्कर म्हणाले. डिसेंबर २०२२ पर्यंत असलेली एकूण १,१९४ खाटांची क्षमता ही २,५०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
बहुतारांकित रुग्णालय श्रृंखला असलेल्या ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्सने प्रस्तावित प्रारंभिक समभाग विक्रीपूर्वी (आयपीओपूर्व) संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १२३ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. कंपनीने प्रत्येकी ७३५ रुपये किमतीप्रमाणे १६.७ लाख समभागांची विक्री केली.
ज्युपिटर हॉस्पिटल्सला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून आयपीओच्या माध्यमातून निधी उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरीचे पत्र ११ ऑगस्टला प्राप्त झाले असून, महिनाअखेरपर्यंत सार्वजनिक समभाग विक्री प्रत्यक्षात राबवली जाणे अपेक्षित आहे. त्या आधीच एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, एसबीआय ऑप्टिमल इक्विटी फंड, एसबीआय हेल्थ केअर अपॉर्च्युनिटीज फंड, न्युबर्गर बर्मन युरोप होल्डिंग्स एलएलसी आणि न्युबर्गर बर्मन स्ट्रॅटेजिक इंडिया इक्विटी मास्टर फंड यांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे. याचबरोबर,हाय कनव्हेक्शन फंड -१, अशोका इंडिया इक्विटी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट पीएलसी, थिक इंडिया ऑपर्च्युनिटीज मास्टर फंड एलपी आणि डीसी इक्का लिमिटेड यांनीही गुंतवणूक केली आहे.
कंपनीकडून ‘सेबी’कडे दाखल प्रस्तावानुसार, ६१५ कोटी रुपये मूल्याचे नवीन समभाग आणि आंशिक समभाग विक्रीच्या म्हणजेच ओएफएसच्या माध्यमातून प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडील ४४.५ लाख समभागांची विक्री केली जाणार आहे.
मुंबईस्थित कंपनीकडून भागविक्रीतून मिळणाऱ्या ४६४ कोटी रुपयांच्या निधीचा वापर कर्जफेडीसाठी केला जाणार असून, कंपनी यातून पूर्णपणे कर्जमुक्त होईल, असे ज्युपिटर लाइफ लाइन हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अंकित ठक्कर यांनी सांगितले.