मुख्यमंत्र्यांनी उठविली स्थगिती; घोडबंदर रस्त्याच्या कामाला येणार वेग

ठाणे : महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राज्य शासनाकडे दाखल करण्यात आले असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांना स्थगिती दिली होती. परंतु, जी कामे नागरिकांच्या हिताची आहेत त्या सर्व कामांवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गाच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

ठाणे-घोडबंदर राज्यमार्ग क्र.८४ हा रस्ता वळणा-वळणाचा घाट स्वरूपाचा आहे. या रस्त्यावरून मुंबई, भिवंडी-कल्याण तसेच नाशिककडे त्याचप्रमाणे वसई-विरार तसेच गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या ये-जा करीत असतात. या रस्त्यावरून अवजड वाहनांची देखील वाहतुक होत असल्याने तेथे सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. घोडबंदर रोडवरील भागामध्ये प्रचंड वेगाने झालेले नागरीकिकरण व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या रस्त्यावरील वाहतुक कोंडीमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. हा रस्ता अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरण केलेला असून कालानुरूप जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्या व आरसीसी गटाराची देखील वाताहत झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर दर काही दिवसागणिक मोठ-मोठे कंटेनर पडून अपघात होत असतात, त्यामध्ये वित्त व जीवितहानी देखील होत असते.

ठाणे-घोडबंदर राज्यमार्ग क्रं.८४ हा रस्ता एमएसआरडीसीकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाला असल्याकारणाने नविन व शास्त्रशुध्द पध्दतीने हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला असता या सर्व बांधकामांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आदेश असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात येत होते. त्याकरिता आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नागरिकांच्या हितासाठी सदरहू कामांवरील स्थगिती उठविण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने स्थगिती उठवून जलद गतीने ही कामे सुरू करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारासंघातील घोडबंदर भागातील ठाणे-घोडबंदर राज्यमार्ग क्र. ८४ या मार्गावरील घाटभागांमध्ये रस्त्याची भौमितिक सुधारणा करणे (सा.क्र. ०/०००ते ४/४०० कि.मी.) घाटभागामध्ये दोन ठिकांणी काँक्रीट पेव्हमेंट तयार करणे, या मार्गावरील कासारवडवली जंकशनची सुधारणा करणे (सा.क्र. ८/८०० कि.मी.) अस्तित्वातील मार्गिकेचे काँक्रीट पेव्हमेंटमध्ये रूपांतर करणे, अंतिम मार्गिकेस काँक्रीट पेव्हर ब्लॉक लावणे व आरसीसी गटर्सची दुरूस्ती करणे, तसेच सदरहू रस्त्यांची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे या कामांवरील स्थगिती उठविल्यामुळे निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे असे श्री. सरनाईक यांनी सांगितले.

त्याचबरोबर गायमुख पासून पुर्ण घोडबंदर परिसरातील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण करून त्यावर अनधिकृतरित्या होत असलेली पार्किंग बंद करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त श्री. श्रीनिवासन यांना ’घोडबंदर रोड शेजारी असलेल्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या सुचना केल्या. ’या सर्व कामांमुळे घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे, असे श्री. सरनाईक यांनी सांगितले.