माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, डंपरचालक ताब्यात

डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला दुखापत

भाईंदर: माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने धडक दिली. ते सकाळी पालघरला निघाले होते. काशिमीरा परिसरात ही घटना घडली. या अपघातात सावंत यांच्या मानेला दुखापत झाली. डॉ.सावंत यांना अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णवाहिकेतून अंधेरीच्या रुग्णालयात नेण्यात आले.

दुसऱ्या घटनेत काशिमिरा येथील मीरा गावठाण येथे दुपारी 12.30 वाजता अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि रुग्णवाहिका यांच्यात अपघात झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास या मार्गावरून रुग्णवाहिकेने रुग्णांना नेले जात होते. आयशर टेम्पो आणि रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक झाली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काशिमीरा वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

या रुग्णवाहिकेतील रुग्णांना दुसऱ्या रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णवाहिकेला धडक देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पोच्या चालकाला रस्त्याने जाणाऱ्यांनी पकडून काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, अपघातग्रस्त रुग्णवाहिका क्रेनच्या साहाय्याने बाजूला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.