उल्हासनगर: भिवंडीमध्ये राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल सव्वा दोन किलोची गाठ काढण्यात उल्हासनगर शहरातील डॉक्टरांना यश आले आहे. आता महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉ. मुकुल वाणी यांनी दिली आहे.
भिवंडी येथील पिंपळेघर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेच्या पोटात प्रचंड वेदना होत असल्याने तिला उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेच्या पोटाची तपासणी केली असता तिच्या पोटात गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या अंडाशयाला मोठी गाठ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
सदर गाठ कर्करोगाची आहे का याची तपासणी युद्धपातळीवर करण्यात आली. त्या गाठीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया किचकट असल्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या वतीने उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मुकुल वाणी यांना बोलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत शासकीय रुग्णालयातील अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. नम्रता दोडे, भुलरोग तज्ञ डॉ. दीपक शिंदे, बालरोग तज्ञ वसंतराव मोरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया पार पडली.
एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर महिलेच्या पोटातून तब्बल सव्वा दोन किलोचा गाठीचा गोळा काढण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश मिळाले आणि महिलेला वेदनेतून सुटका मिळाली. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याने महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.