विटाव्यात स्कायवॉकच्या पिलरला विशाल बार्ज धडकले

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

ठाणे: नवी मुंबई येथील खाडीत उभारण्यात येत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या टॉवरकरिता साहित्य घेऊन जाणारे बार्ज विटावा येथील स्काय वॉकच्या पिलरला धडकले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

नवी मुंबईच्या खाडीत महावितरण कंपनीमार्फत विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी साहित्य घेऊन जाण्यासाठी मार्ग नसल्याने ठेकेदार कंपनीने मोठ्या बोटीवर (बर्ज) तीन सिमेंट काँक्रिटच्या मिक्सरचे ट्रक, एक क्रेन आणि इतर साहित्य घेऊन बार्ज जात असताना विटावा स्कायवाक येथील एका पिलरला तो धडकला. यात पिलरच्या कोपऱ्याचे नुकसान झाले आहे.

या बाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तो बार्ज खाडीतून नवी मुंबईकडे रवाना झाला.

बार्जला खाडीमार्गे साहित्य घेऊन जाण्याची परवानी देण्यात आली होती का, स्कायवॉकला धडक बसल्याने ते धोकादायक झाले का याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी होत आहे.