भिवंडी: शहरात नारपोली भागातील अजमेरनगर येथील माउली झेरॉक्स व स्टेशनरीसमोरील गटाराचे झाकण न बसविल्याने त्या गटारामध्ये दीड वर्षाचा मुलगा पडून त्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी मुलाच्या पालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात भिवंडी महापालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे काम पाहणाऱ्या अभियंत्याचे नाव स्पष्ट न झाल्याने पोलीस अभियंत्याच्या शोधात आहेत.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात अनागोंदी काम सुरु असून त्याचा हा बळी असल्याची माहिती स्थानिक समाजसेवक देत आहेत. अनेक ठिकाणी नगरसेवक ठेकेदार बनून गटारे बांधत आहेत. अनेक बांधकामाच्या ठिकाणी पालिकेचे अभियंते फिरकत नाहीत. त्यामुळे शहराचे नियोजन नसल्याचे पदोपदी जाणवत आहे.
प्रथमेश यादव (१८ महिने) असे मयत मुलाचे नाव असून त्याचा या गटारात पडून मृत्यू झाल्याने त्याचे वडील कमलेश यादव यांनी नारपोली पोलीस ठाण्यात गटाराचे ठेकेदार मुक्तादिर बुबेरे व उप कंत्राटदार प्रवीण सूर्यराव यांच्यासह कनिष्ठ अभियंता प्रभाग समिती क्र.३ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या घरासमोर गटाराचे बांधकाम झाल्यानंतर आरसीसी चेम्बरवर लादी न बसविल्याने या गटारात पडून काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत. ठेकेदारास वेळोवेळी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची जाणीव करून देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलाच्या मरणास कारणीभूत असल्याची तक्रार कमलेश यादव याने तक्रारीत नमूद केले आहे.