भगव्या तलावाच्या धर्तीवर गौरीपाडा तलावाचाही कायापालट होणार

कल्याण : भगव्या तलावाच्या धर्तीवर गौरीपाडा तलावाचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले.
कपिल पाटील यांच्या हस्ते कल्याण पश्चिम येथील विविध नागरी कामांचा भूमिपूजन समारंभ तथा उद्घाटन समारंभ रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जून म्हात्रे, नगरसेवक दया गायकवाड आदी उपस्थित होते
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील गणेश घाट कामाचे सुशोभीकरण कामाच्या उदाघाटन प्रसंगी केद्रिंय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, या तलावाच्या सुशोभीकरणासाठी माझ्या खासदार फंडातून दहा लाख रुपये निधी भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ मात्रे आणि माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, दया गायकवाड यांच्या सूचनेवरून या ठिकाणी दिलेला आहे. या पुढेही तलावाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून हे काम जलद गतीने मार्गी लावत भगव्या तलावाच्या धर्तीवर गौरीपाडा कर्नाळा देवी तलावाचा कायापालट करून नागरिकांसाठी मनोरंजन, विरगुंळा होईल असे ठिकाण तयार होणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार माझ्या मतदारसंघातील जलस्तोत्रांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करून नैसर्गिक जलस्तोत्रांचे संवर्धन कसे होईल याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याण पश्चिम विभागात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांच्या भूमिपूजनासाठी रविवारी ते कल्याण येथे आले होते. यावेळी दुर्गाडी किल्ला गणेश घाटाचे सुशोभीकरण, वायलेनगर येथील चंद्रेश गॅलेक्सी ते मंगला गार्डन रस्त्याचे उद्घाटन, गौरी पाडा येथील साई सृष्टी जय गुरुजी टॉवर शनि धाम साई रिजन्सी येथील रस्त्यांचे भूमिपूजन, तसेच भाजपा कल्याण पश्चिम मंडळ व संत निरंकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गौरीपाडा विभागातील कर्नाळा तलाव व जवळील परिसरात स्वच्छता अभियान व योगी धाम परिसरात जेष्ठ नागरिक कट्ट्याचे भूमिपूजन असे विविध कार्यक्रम झाले.