कोपरीत रिक्षाचालकांची वेगमर्यादा ओलांडण्याची शर्यत

ठाणे : ठाणे पूर्व आणि १२ बंगला परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून लहान-मोठ्या वाहनांची गर्दी सकाळी-सायंकाळीही वाढली असतानाच, मुख्यत्वे अनेक रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारांमध्ये वेगमर्यादा ओलांडण्याची जणू स्पर्धा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच एकही ठाणे वाहतूक पोलीस तैनात नसल्याने त्यांना कोणीही रोखत नाहीत. वाहने बेफाम हाकण्याची जणू शर्यत लागलेली असते.

दोन-तीन दिवसांपूर्वी ऐन सकाळी वॉकसाठी आलेल्या महिलेला एका मोटार सायकलस्वाराने भरवेगात गाडी थेट पदपथावर चढवून जोरदार धडक दिली. यात ती जखमी झाली. जर येथे वाहतूक पोलीस असता तर त्याने त्वरीत योग्य ती कारवाई केली असती.

ठाणे पश्चिमेकडून पूर्वेला आणि पूर्वहून पश्चिमेला जाणारे दररोज शेकडो रिक्षाचालक आहेत. सध्या ठाणे कोपरीत सॅटीस आणि मेट्रोची अनेक कामे सुरु आहेत. ऐन सकाळी आणि सायंकाळी याच भागात कामे होत असल्याने चार चाकी वाहने, बसगाड्या, बेस्ट आणि एका महापालिकेच्या उपक्रमाच्या प्रवासी बसगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. ती टाळण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षाचालक शांतीनगरमध्ये वाहने नेतात किंवा तेथील भागातून बाहेर पडतात. त्यांची संख्या मोठी असते. कोपरी पुलाकडे जाणारा किंवा शांतीनगरकडे जाणा-या रस्त्याची डागडुजी करतानाच तो गुळगुळीतही केल्याने या रस्त्यांवरुन जाणारी वाहने ‘सुस्साट’ जातात. या रस्त्यावर लहान-मोठे खड्डे होते परंतू, ते काही दिवसांपूर्वी बुजवून रस्ता ‘तुळतुळीत’ केल्याने महिलेला अपघात झाल्याची माहिती सकृतदर्शनी पादचा-यांनी ‘ठाणेवेभव’ला दिली.