मनविसेने मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांसाठी कंबर कसली

नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

ठाणे: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी शिवसेना, भाजप, शिंदे गट व मनसेकडूनही जोरदार मोर्चेबांधणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेने कंबर कसली असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या होलसेल नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तळागळातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यापासून सिनेट निवडणुकांकरिता विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यापर्यंत मनविसेने ॲक्शन प्लॅन आखला आहे.

राजकीय नेत्यांच्या विद्यार्थी चळवळीचे भविष्य ठरवणारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटना रणनिती आखत आहेत. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटासह भाजप वरिष्ठ पातळीवर सिनेट निवडणुकांची तयारी करत असताना राज्यासह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने स्थानिक पदाधिकार्‍यांची मोट बांधली आहे.

गेल्या तीन महिन्यात सिनेट निवडणुकीकरिता झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ठाण्यातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही तीन टप्प्यात ठाण्यातील मनविसे पदाधिकार्‍यांच्या तळागाळापर्यंत नियुक्त्या केल्या आहेत. या ॲक्शन प्लॅननुसार दोनच दिवसांपूर्वी ठाण्यातील तब्बल ६५ ते ७० कार्यकर्त्यांची शहर सचिव, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष पदांवर नियुक्ती करण्यात आली. खुद्द अमित ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपञ प्रदान करण्यात आले.

यावेळी मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे, शहराध्यक्ष निलेश वैती, शहर संघटक संदीप चव्हाण, प्रमोद पत्ताडे, शहर सचिव अमित मोरे, उप शहर अध्यक्ष राकेश आंग्रे, मयूर तळेकर, हेमंत मोरे आदी उपस्थित होते.

युवासेना, भाजपयुवा मोर्चा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसप्रमाणेच ठाण्यातील मनविसेत महिला कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ठाण्यातून कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला सिनेट निवडणुकीत ठाण्यातील विद्यार्थी कौल देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.