ऋता आव्हाड यांचा ठामपावर आरोप
ठाणे : नवीन गटात गेलेल्या नगरसेवकांवर मेहेरनजर म्हणून एकदा पूर्ण झालेल्या तसेच सुस्थितीत असलेल्या कळवा, मुंब्रा येथील नागरी कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी ठाणे महानगरपालिकेकडून केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे.
एकीकडे ठाणे महानगरपालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत दयनिय असल्याचे वृत्त अनेकदा प्रसारीत करण्यात येत असतानाच ठाणे महानगरपालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. या कामांमध्ये, कळव्यातील इंदिरा नगर पादचारीपुल ते रामेश्वर सोसायटी या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यासाठी तीन कोटी रुपये; खारीगाव रेल्वेफाटक ते सर्व्हेक्षर बिल्डींग या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रिटीकरणासाठी चार कोटी 60 लाख; स्वामी समर्थ मठ ते ओंकार सोसायटी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 6.50 कोटी; आरजी 22 ते रघुकूल सोसायटीमधील मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2.50 कोटी; केशव हाईट्स ते रिलायन्स पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी चार कोटी; मुंब्रा प्रभाग समितीमधील रेतीबंदर स्मशानभूमी रस्ता तयार करण्यासाठी एक कोटी 17 लाख आणि ओऍसीस आर्केड येथील रस्त्यासाठी 59 लाखांची तजवीज करुन या कामांचे वाटपही करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, आधीच ही सर्व कामे पूर्ण झाली असून हे सर्व रस्ते सुस्थितीमध्ये आहेत. या रस्त्यांच्या कामांची हमीदेखील घेतली जात आहे. असे असतानाही नव्याने स्थापन झालेल्या गटात सहभागी झालेल्या नगरसेवकांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे ऋता आव्हाड यांनी म्हटले आहे.