देवा तुझ्या दारी आलो…

* देवदर्शन करत नववर्षाची सुरुवात
* जिल्ह्यातील मंदिरे भक्तांनी फुलली

ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत करताना नाच, गाणी, धम्माल आणि पर्यटनाबरोबरच दारूपार्टी असे चित्र एक बाजूला दिसत असले तरी समाजाचा एक मोठा वर्ग मंदिरात जाऊन देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरवात करत असल्याचे दुसरीकडे दिसत होते. रविवारी जिल्ह्यातील सर्व मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती.

जगभरात नवीन वर्षाच्या जल्लोषात स्वागत होत असताना ठाणे जिल्ह्यातील लाखो भाविकांनी देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात केली. टिटवाळा गणपती मंदिर, डोंबिवलीचे गणपती मंदिर, बदलापूरचे खंडोबा मंदिर, अंबरनाथचे शिवमंदिर, ठाण्यातील कौपीनेश्वर मंदिर, वर्तकनगरमधील साईबाबा मंदिर, मुंबा देवी मंदिर, घंटाळी मंदिर, कोपरीतील स्वामी समर्थ मठ, रविवारी पहाटेपासून भक्तांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते.

ठाणे, कल्याणसह सर्वच शहरांमधील मंदिरांमध्ये भक्तांनी हे वर्ष सुख समृद्धीचे जावे यासाठी प्रार्थना केली. जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नव वर्षाची संधी साधत जिल्ह्यातून असंख्य भाविकांनी शिर्डी, शेगाव, पंढरपूर गाठले आहे. तर काहींनी जिल्ह्यातील प्रसिद्ध जागृत मंदिरांना भेटी दिल्या. अनेकांनी घराजवळ किंवा शहरातीलच मंदिरात हजेरी लावत पूजा, प्रार्थना केल्याचे रविवारी दिसून आले. यानिमित्ताने मंदिरेही फुलांनी सजवण्यात आली होती. डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थानच्या  प्रसिद्ध गणपती मंदिराचा गाभारा नववर्षासाठी आकर्षक फुलांच्या सजावटीने फुलून गेला होता. भाविकांच्या रांगा आप्पा दातार चौकापर्यंत पोहचल्या होत्या. बदलापूर येथील शिवकालीन जागृत खंडोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. थंडीची पर्वा न करता डोंगराच्या माथ्यावर ४५० पायर्‍या चढत भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.

अंबरनाथच्या शिवमंदिरात श्रावणी सोमवारसारखी दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. मंदिराचे पुजारी विजय पाटील यांच्या हस्ते आज महादेवाची पूजा झाली. खेर विभागातील हेरंभ मंदिर, स्वामी समर्थ मठात आणि गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिरात देखील दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती.