‘ग्रेड पे’सह सातवा वेतन आयोग
ठाणे: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर नगर विकास विभागाने ठाणे महापालिकेला सहाव्या वेतन आयोगाची विद्यमान वेतनश्रेणी व ग्रेड पे संरक्षित करून नवीन वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठामपा कर्मचाऱ्यांचा पगार दीड पटीने वाढणार आहे.
ठाणे महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगावर आधारित वेतनश्रेणी म्हणजेच ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाचे न्यायमूर्ती पाटील यांनी दिलेल्या निवाड्यानुसार असलेले वेतन व ग्रेड पे नुसार सातवा वेतनावर आधारित वेतनश्रेणी देण्याची मागणी कामगार नेते व म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी केली होती. परंतु राज्य शासनाच्या निर्देशानुसार कर्मचार्यांच्या ग्रेड पेमध्ये कपात करून शासन समकक्ष वेतनश्रेणी लावण्याची प्रक्रिया ठामपा प्रशासनाने सुरू केली होती. त्या विरोधात औद्योगिक न्यायालय ठाणे येथे धाव घेतली व प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती मिळवली. त्यानंतर प्रशासनाने युनियनच्या मागणीप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव २८ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाला सादर केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत युनियन नेत्यांनी भेट घेतली होती.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे अखेर सोमवारी १४ नोव्हेंबरला नगर विकास विभागाच्या अवर सचिव निकिता पांडे यांनी ठाणे महापालिकेला पत्र पाठवून सहाव्या वेतन आयोगाची विद्यमान वेतनश्रेणी व ग्रेड पे संरक्षित करून नवीन वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशी होणार वेतन वाढ
सातवा वेतन आयोग लागू करताना ग्रेड पे कमी केल्यामुळे कर्मचार्यांचे ५,६०० ते १३ हजारांपर्यंत नुकसान होणार होते. पण आता ग्रेड पेनुसार नवीन वेतन श्रेणी लागू केल्यास पगारात दीडपट वाढ होणार आहे. सध्या सफाई कर्मचार्याला २० ते २२ हजार वेतन मिळते, ते वाढून २८ ते ३० हजार रुपये होणार आहे. लिपिकाला ३० ते ३५ हजार मिळणारे वेतन ४५ ते ५५ हजारांवर पोहचणार आहे. तर सहाय्यक आयुक्तांचे वेतन ४५ वरून ६० हजार रुपये होणार आहे.