बुधवारी ठाण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धिकरण केंद्र येथील एच.टी सबस्टेशनमधील तांत्रिक दुरुस्ती आणि शहरातील विविध ठिकाणच्या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात येणार आहे.

जयभवानीनगर स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अंतर्गत बाधित होणाऱ्या जलवाहिन्या व पंपिंग स्टेशनच्या उच्चदाबाचे पॅनल्स् स्थंलातरित करण्यात येणार असल्याने बुधवार १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांचा ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

बुधवार १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी ठाणे शहरातील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर भागात पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच ठाणे शहरातील उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु राहील.

वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.