ठाणे : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोंढेरी व आदिवली गावातील स्वच्छता, शोषखड्डे, नॅडॅप खड्डे, पाझर खड्डे, शालेय शौचालय, पाणी पुरवठा योजना, वैयक्तिक नळ जोडणी, पाणी गुणवत्ता या बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाच्या जलशक्ती मंत्रालयातील सचिव वीणा महाजन यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कल्याण तालुक्यातील कोंढेरी व आदिवली गावाची पाहणी केली. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, प्रकल्प संचालक रणधीर सुर्यवंशी, जलजीवन मिशनचे जल तज्ज्ञ अमरिशजी यांचा पथकात समावेश होता.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राजेश निघोट, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जून गोळे, माजी उपसभापती यशवंत दळवी, गटविकास अधिकारी अशोक भवारी, उपअभियंता श्री. महाडिक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मांदळे, गटशिक्षण अधिकारी रुपाली खोमणे, बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना पवार, सरपंच पुंडलिक हरड व सुनील पाटील यांच्यासह गावातील सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, महिला बचत गट सदस्या, तालुक्यातील ग्रामसेवक, जिल्हा व तालुका पाणी व स्वछता मिशन कक्ष कर्मचारी उपस्थित होते.
या दौऱ्यात प्रथम कोंढेरी गावातील स्वच्छताविषयक कामे तसेच पाणीपुरवठा योजना, वैयक्तिक नळ जोडणी, पाणी गुणवत्ता यांची पाहणी पथकाने केली. यावेळी श्रीमती महाजन यांनी पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना स्वच्छताविषयक माहिती देऊन जलजीवन मिशन, पाणी गुणवत्ता, शोषखड्डेल व सार्वजनिक आरोग्यविषयी मार्गदर्शन केले.
आदिवली गावातील ग्रामस्थ व आदिवासी महिला भगिनींनी पारंपरिक आदिवासी संस्कृतीनुरुप केंद्रिय पथकाचे स्वागत केले. पथकाने गावाची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर केले. श्रीम. महाजन यांनी आदिवली गावातील विजय फसाळे या युवकाचा एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभागाबद्दल व शेतकरी दुंदा फसाळे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचा सन्मान केला. श्रीमती महाजन यांनी ग्रामस्थांनी संवाद साधत आरोग्य, स्वच्छता, पाणी गुणवत्ता विषयी मार्गदर्शन केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध अभिनव लोकोपयोगी संकल्पना, योजनांचा कृतीसंगम करण्यासह शासकिय उपक्रम, विकास योजना यांची अंमलबजावणी करुन जनसेवेसाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.