काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या हिंदुविरोधी वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन

ठाणे : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाबाबत चुकीचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाणे शहर जिल्हा भाजपच्या वतीने खोपट येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, संदीप लेले, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जारकीहोळी यांनी केलेले विधान राष्ट्रद्रोही असून, त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जारकीहोळी व काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. कर्नाटक काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून, त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे व हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय, असे हिंदूविरोधी वक्तव्य केले. यातच भर घालत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधींसाठी मराठी लायक नाहीत असेही अत्यंत घृणास्पद वक्तव्य त्यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या मदतीने मोगलांविरुद्ध लढा देत मस्जिद उभारली होती अशी मुक्ताफळे उधळली. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी भाजप ठाणे शहर जिल्हाच्या वतीने ठाण्यातील खोपट कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडोचे कार्य करीत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे सतीश जारकीहोळी धर्म तोडो चे काम करत आहेत. त्यांचे वक्तव्य हा केवळ हिंदू धर्माचा, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान नसून हा राष्ट्रद्रोह आहे. अश्या प्रकारचा अपमान करणाऱ्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.