मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात रुग्ण सुविधा वाढवणार

आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

ठाणे: किसननगर, श्रीनगर भागातील नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात रुग्ण सुविधांचा आणखी विस्तार करण्याबाबत ठाणे महापालिका सकारात्मक असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

किसन नगर, वागळे इस्टेट पाहणी दौऱ्यात आयुक्त श्री. बांगर यांनी मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयालाही भेट दिली. पाचही मजल्यावरील कामकाज, व्यवस्था आयुक्तांनी समजून घेतली. तळमजल्यावरील ओपीडीमध्ये स्वाभाविकपणे सर्वाधिक गर्दी होती. तेथे रुग्णांच्या नातेवाईकांशी आयुक्तांनी संवाद साधला. तसेच, शौचालयांची पाहणी केली. ओपीडीमधील गर्दी लक्षात घेता ही शौचालये वेळोवेळी स्वच्छ झाली पाहिजेत, अशा सूचना आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापकांना दिल्या. रुग्णालयांच्या पायऱ्यांवर काही रुग्ण तसेच त्यांचे  नातेवाईक नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. त्यांच्यासाठी रुग्णालयांच्या हालचालींवर कोणतीही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने जिन्याच्या कोपऱ्यात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यास आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.

एकंदर स्वच्छतेबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी, रुग्ण संपर्कासाठी दिलेली कॉल सेंटरचा एक नंबर बंद असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दुसरा नंबर वापरात असल्याचे व्यवस्थापनाने सांगताच तो फोन नंबर सगळीकडे दिसेल असा लावण्याची सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची पाहणी करताना आयुक्तांनी काही सूचना केल्या. जेवण गरम असावे, चांगल्या दर्जाचे असावे, हातमोजे घालूनच जेवण वाढले जावे, जेवण देताना नीट काळजी घेतली जावी, असे आयुक्त म्हणाले.

या रुग्णालयाची अग्निसूरक्षा चाचणी करण्याचे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी अग्नीशमन अधिकाऱ्यांना दिले. तसेच, रूग्णालयासमोरील गटाराची तुटलेली झाकणे ताबडतोब बदलण्यास उपायुक्त शंकर पाटोळे यांना सांगितले.

‘सीझेरीयन’ची व्यवस्था करावी

मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयांनजिक असलेल्या पालिकेच्या मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहात सीझेरीयनच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करावी, असे निर्देश आरोग्य विभागास दिले.